दोन दिवसांपासून जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून, पारा १४ अंशापर्यंत खाली घसरला आहे. गुरुवारी पहाटेपासून गारव्यासोबत जोरदार वारे वाहात असल्याने सकाळी उशिरापर्यंत ग्रामीण भागात शेकोटय़ा धुमसत आहेत.
तब्बल दीड महिन्याच्या विलंबाने यंदा थंडीचे आगमन झाले असून, नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या पहिल्या पंधरवडय़ात ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात उष्मा होता. गेल्या आठवडय़ात गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसीय अवकाळी पावसाने हजेरी लावली. तासगाव, खानापूर तालुक्यात तर दमदार पाऊस झाला. विसापूर मंडलात अवकाळी पावसाने ८३ मिलिमीटर हजेरी लावली.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ हवामान कमी झाले असले तरी त्यासोबत थंड वाऱ्यासोबत गारठाही जाणवू लागला आहे. सायंकाळपासून वातावरणात कमालीची थंडी जाणवत आहे. जिल्ह्यात १४ अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमान जात असून उच्चतम तापमान २५ अंशापर्यंत जात आहे.
दरवर्षी दसरा-दिवाळीपासून सुरू होणारा थंडीचा हंगाम यंदा दीड महिना विलंबाने सुरू झाला असून याचा रब्बी पिकांना लाभ होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. रब्बी ज्वारी, गहू, हरभरा आणि करडई या पिकांच्या वाढीसाठी थंडीची गरज असल्याने सध्या पडणारी थंडी रब्बीसाठी लाभदायी ठरत आहे.

Story img Loader