नगर ५.९ अंश, नाशिक ६.२, नागपूर ६.३, पुणे ७.४, जळगाव ८.९, परभणी ७, औरंगाबाद ९.६ अशा तापमानांसह राज्याच्या बहुतांश भागात थंडी अधिक बोचरी बनली आहे.  विशेष म्हणजे येत्या काही दिवसांमध्येही असेच वातावरण अपेक्षित असल्यामुळे नवीन वर्षांच्या स्वागताला थंडीसुद्धा साथीला असण्याची शक्यता आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे पुणे-नाशिकसह राज्याच्या बऱ्याचशा भागात थंडीची लाट पसरली आहे. विशेषत: विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात तिची तीव्रता अधिक आहे. त्यामुळेच नागपूर येथे गुरुवारी सकाळी पारा ६.३ अंशांपर्यंत खाली आला.
मराठवाडय़ात परभणी येथे तो ७ अंशांवर आला, तर नगरमध्ये सर्वात कमी म्हणजे ५.९ अंशांपर्यंत खाली आला. याचप्रमाणे पुणे (७.४), मालेगाव (८), गोंदिया (८.२), अकोला (८.८), वर्धा (९), यवतमाळ (८), अकोला (८.८), औरंगाबाद (९.६), येथेली तापमान दहा अंशांच्या खाली उतरले होते. या सर्वच ठिकाणी ते सरासरीच्या तुलनेत कमी होते.     
मुंबई व दक्षिण महाराष्ट्रात फारशी थंडी नाही
कोकणात विशेषत: मुंबई व दक्षिण महाराष्ट्रात मात्र फारशी थंडी नव्हती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस हीच स्थिती अपेक्षित आहे. हा अंदाज खरा ठरला, तर नवीन वर्षांच्या स्वागताला थंडीही सज्ज असेल.