विश्वास पवार

भाजपवासी झाल्यावरही उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंह भोसले यांच्यातील दरी कमी झालेली नाही व त्याचे प्रत्यय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आला. उभयतांनी आपापल्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन केले, पण त्यातही सवतासुभा होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचे पुण्यातून साताऱ्यात रविवारी  आगमन झाले. पाचवड येथे शिवेंद्रसिंहराजे भोसले महाजनादेश यात्रेत सामील झाले. साताऱ्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उदयनराजे यांचे निवासस्थान जलमंदिर पॅलेस व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सुरू निवासस्थान सुरुची बंगला येथे पाहुणचार घेतला. आजपर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्याने साताऱ्यातील दोन्ही राजांच्या निवासस्थानी एकाच दिवशी भेट दिली नव्हती.  महाजनादेश यात्रा पोवई नाक्यावर आल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. महाजनादेश रॅलीत उदयनराजे सामील झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

सातारा शहराची फेरी पूर्ण करून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा कार्यक्रमस्थळी आली. कार्यक्रमासाठी सातारा सैनिक स्कूलच्या मैदानावर मंडप उभारण्यात आला होता. सभास्थानाच्या आजूबाजूला व शहरात उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे त्यांच्या कार्यकर्त्यांनी फलकबाजी केली.

दोन्ही राजांनी विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्वीचे वाद विसरले असे चित्र उभे करण्याचा प्रयत्न होता. पण दोन्ही राजांच्या मनात असलेली एकमेकांच्या विषयी असलेली सल, एकमेकांची दुखावलेली मने.मागील चार-पाच वर्षांत एकमेकांवर झालेले आरोप-प्रत्यारोप, कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे व त्यांची दुखावलेली मने हे विसरले जाणार काय, हा प्रश्न आहे. दोघांच्या सततच्या संघर्षांत सातारा येथील बिघडलेले अर्थकारण याबाबत सातारकर प्रश्न विचारणार काय, हा मुद्दा आहे. सभेच्या निमित्ताने दोन्ही राजांनी आपल्या पक्षांतराबाबत भाष्य केले.

माझ्या कोणत्याही संस्थेची सध्या चौकशी सुरू नाही. सातारा जावळीच्या विकासासाठी मी अत्यंत ताठ मानेने भाजपमध्ये गेलो आहे .कोणत्याही मंत्रिपदाच्या तुकडय़ासाठी मी गेलेलो नाही. आम्ही शिकार करून खाणाऱ्यांच्यातील औलाद आहे. कोणाच्याही तुकडय़ावर जगणाऱ्यातील आम्ही नाही.

– शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा जिल्ह्य़ातील  मुख्यमंत्री  असताना जिल्ह्य़ामध्ये शेतकी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र, सातारा येथे आयआयटी, आयएमसारखी अनेक कामे सुचविली. त्यांनी या कामांना केराची टोपली दाखवली. परंतु या मुख्यमंत्र्यांनी मी विरोधी खासदार असतानासुद्धा  मैत्रीच्या निमित्ताने सातारा जिल्ह्य़ाच्या विकासासाठी मोठा निधी दिला. माझे अनेक प्रस्ताव मंजूर केले.

– उदयनराजे भोसले

Story img Loader