रविवारी आलेल्या वादळी वाऱ्याचा व गारपिटीचा तडाखा या जिल्ह्य़ातील १०, अमरावती जिल्ह्य़ातील ४, तर यवतमाळ जिल्ह्य़ातील ६ तालुक्यांना बसला असून गहू, हरभरा, तूर, संत्र्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. यात नागपूर जिल्ह्य़ातील काटोल, नरखेड, सावनेर व कामठी तालुक्यात ९० टक्के, तर रामटेक, मौदा, कळमेश्वर, पारशिवनी, कुही तालुक्यात जवळपास ५० टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या नुकसानीची कृषी विभागाकडून पाहणी सुरू करण्यात आली आहे.
गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे खरीप पिके हातची निघून गेल्यानंतर शेतकऱ्यांची सगळी भिस्त रब्बी हंगामावर होती. हरभरा व गहू कापणीस आला आहे, पण रविवारचा अकाली पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. गहू पूर्णपणे कोलमला, मृगबहाराची संत्री व आंब्याचा मोहरही गळून पडला, पण त्याची अधिकृत माहिती कृषी विभागाकडे उपलब्ध नाही. या नुकसानीची पाहणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी दिली.
कालच्या संकटाचा सर्वाधिक तडाखा काटोल, नरखेड, कामठी आणि सावनेर तालुक्याला बसला. या तालुक्यात गहू, हरभरा आणि संत्र्याचे ९० टक्के नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. रामटेक, कळमेश्वर, पारशिवनी, कुही, मौदा या तालुक्यांमध्ये ५० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे. उमरेड, भिवापूर आणि हिंगणा हे तीन तालुके सोडले तर संपूर्ण जिल्ह्य़ातीलच शेतकऱ्यांपुढे आणखी अस्मानी संकट उभे ठाकले आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी १५ हजार रुपये मदत देण्याची मागणी केली आहे.
अमरावती जिल्ह्य़ात वरूड, तिवसा, धामणगाव रेल्वे आणि चांदूर रेल्वे तालुक्यातील अनेक गावांमध्ये पीकहानी झाली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानीतून शेतकरी सावरत नाहीत, तोच या अकाली पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकला गेला आहे. वरूड तालुक्यातील १८ गावांना गारपिटीचा तडाखा बसला आहे. या भागात बोर आणि आवळ्याच्या आकाराच्या गारांनी सर्वाधिक नुकसान संत्राबागा व काढणीवर आलेल्या गहू आणि हरभरा पिकांचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. महसूल यंत्रणेने गारपीटग्रस्त भागात सर्वेक्षणाला सुरुवात केली असून येत्या काही दिवसात नेमके किती नुकसान झाले, हे कळू शकेल, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे मोर्शीचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी सर्वेक्षण तातडीने करून गारपीटग्रस्तांना मदत देण्यास विलंब केला जाऊ नये, अशी मागणी केली आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ात पुसद, नेर, दिग्रस, वणी, कळंब व आर्णी तालुक्यात सुमारे पाऊण तास गारांचा थर रस्त्यावर साचलेला होता. आर्णीत विदर्भ साहित्य संमेलनालाही गारपिटीचा तडाखा बसला. संमेलनातील बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्र प्रदर्शनातील व्यंगचित्रांनाही वादळी पावसाचा तडाखा बसला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा