नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे व आमदार बबनराव पाचपुते यांनी शनिवारी एकत्रितपणे पारनेरचा दौरा केला, मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांना हा दौरा अध्र्यावर सोडावा लागला.
राजळे तेथे येण्यापूर्वी झावरे यांच्या रक्तातील साखर कमी झाल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांच्या शेजारी असलेल्या बबनराव पाचपुते यांनी त्यांना तातडीने पाणी तसेच साखर दिली. त्यानंतर झावरे यांनी दौरा सोडून नगरकडे प्रयाण केले. नगर येथे खाजगी रूग्णालयात त्यांनी उपचार घेतले.
राजळे यांनी पिंपळनेर, राळेगण थेरपाळ, जवळा, वाडेगव्हाण, सुपे, कान्हूरपठार आदी गावात सभा घेऊन मतदारांशी त्यांनी संवाद साधला. माजी मंत्री बबनराव पाचपुते, पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष अशोक सावंत, ज्ञानदेव पठारे, बाजार समितीचे सभापती काशिनाथ दाते, उपभापती अरूण ठाणगे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष उदय शेळके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पोपट पवार, जि. प. सदस्य विश्वनाथ कोरडे, गंगाराम रोहकले, सुवर्णा धाडगे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते शिवाजी सालके, सुभाष आढाव, दीपक नाईक आदी यावेळी उपस्थित होते.
राजळे म्हणाले, गावागावांमधील दोन गटांमुळे गेल्या निवडणुकीत दिलीप गांधी निवडून आले. या मतदारसंघाला असा लोकप्रतिनिधी मिळाला की, जो शेतकरी नाही,  शेतकऱ्याच्या विचारांचा नाही. ते दुष्काळात कधी जनतेपर्यंत गेले नाहीत, त्यांचा दहा वर्षांंचा कारभार निष्क्रियच आहे. मी शेतकऱ्याच्या घरातला, शेतकऱ्याचा प्रतिनिधी आहे. पाच वर्षे विधानसभेत दूध धंदा, पाटपाणी, पिकविमा आदी विविध प्रश्नांवर आवाज उठवला असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची आपणास जाण आहे.
पाचपुते म्हणाले, गेली दोन वर्षे आपण दुष्काळ पाहिला, परंतु शासनाने तो जाणवू दिला नाही. खासदार गेल्या दहा वर्षांत तुमच्या गावात किती वेळा आले असा सवाल त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा