लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर : भौगोलिक मानांकन मिळालेले सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब जगाच्या पाठीवर कोणत्याही बाजारपेठेत त्याच्या गुणात्मक वैशिष्ट्यामुळे भाव खात आहे. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून डाळिंबाच्या बागा अनेक समस्यांमुळे संकटात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यातील प्रवीण माने या शेतकऱ्याने दहा वर्षे संशोधन करून डाळिंबावर एक खोड तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यावर प्रभावित होऊन सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपल्या शासकीय बंगल्याच्या परिसरात दोन एकर क्षेत्रात हा आधुनिक प्रयोग राबविण्यासाठी प्रवीण माने यांना गळ घातली आहे.

काय आहे नवा प्रयोग?

माढा तालुक्यातील मोडनिंब-बैरागवाडी येथील तरुण डाळिंब उत्पादक शेतकरी प्रवीण माने यांच्या शेतात स्वखर्चाने अखंड दहा वर्षे संशोधन करून एक खोड पद्धतीने डाळिंब लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. डाळिंबाची नैसर्गिक ताकद ओळखून पूरक पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना अवलंबविल्या आहेत. त्यामुळे जमिनीचे आरोग्य वाढतेच; शिवाय डाळिंबाशी संबंधित ज्वलंत समस्या आपोआप कमी होऊन डाळिंबाचे गुणात्मक आणि संख्यात्मक उत्पादन मिळते. त्याचबरोबर डाळिंब उत्पादनाचा खर्चही कमी होतो. त्यामुळे पैसा आणि श्रमाची बचत होते, असा प्रवीण माने यांचा दावा आहे.

आणखी वाचा-आभासी जगातील प्रेमभंगातून युवतीची आत्महत्या, साताऱ्यातील घटनेत मैत्रिणीकडूनच फसवणूक

जिल्हाधिकाऱ्यांना नव्या तंत्रज्ञानाचे कुतूहल

याच अनुषंगाने उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथील लोकमंगल साखर कारखान्याच्या डाळिंब बाग प्रकल्प पाहणीसह मोडनिंब येथे प्रवीण माने यांच्या डाळिंब बागेत एक खोड तंत्रज्ञानाच्या विषयावर कार्यशाळा आयोजिली होती. या कार्यशाळेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सहभागी झाले होते. प्रवीण माने यांचे हे तंत्रज्ञान डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना वेगळी दिशा देणारे ठरेल. हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आहे तसे अवलंबविले तर डाळिंब उत्पादक समस्यांपासून मुक्त होतील, असा विश्वास व्यक्त करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपल्या शासकीय निवासस्थानाच्या परिसरात दोन एकर क्षेत्रात डाळिंब एक खोड तंत्रज्ञानावर आधारित डाळिंब बाग निर्माण करण्याचा मनोदय प्रकट केला. त्यासाठी त्यांनी प्रवीण माने यांना गळ घातली. त्यानुसार लवकरच सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांच्या ‘ शिवदर्शन ‘ बंगल्याच्या परिसरात डाळिंब बागेची निर्मिती होणार आहे.

या कार्यशाळेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गवसाने, कृषी उपसंचालक (स्मार्ट सोलापूर) मदन मुकणे, आत्माच्या प्रकल्प संचालक शीतल चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे, कुर्डूवाडीचे उपविभागीय कृषी अधिकारी संजय वाकडे, माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे, प्रा. डॉ. प्रशांत कुंभार आदींसह सुमारे दीड हजार डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी भाग घेतला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Collector kumar ashirwad expressed his desire to create a pomegranate garden based on new technology mrj
Show comments