छेडछाडीस कंटाळून शहरातील श्रुती कुलकर्णी (वय २३) या तरुणीने सोमवारी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी तिचा मृत्यू झाला. ‘आई, तुझं नाव खूप मोठं करायचं होतं, पण काही करू शकले नाही. स्वप्निलनं माझ्याकडे ऑप्शन ठेवला नाही,’ अशा आशयाची चिठ्ठी तिने लिहून ठेवली आहे. शहराच्या सिडको भागात ती राहात होती.
एकतर्फी प्रेमातून श्रुतीला स्वप्निल मणियार हा तरुण त्रास देत होता. महाविद्यालयातही श्रुतीची छेड काढली जात होती. याबाबत तिने तिच्या बहिणीला व घरच्यांना कल्पना दिली होती. सिडको पोलीस ठाण्यात तिने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी स्वप्निलला ३ ऑगस्ट रोजी पोलिसांनी अटक केली, मात्र जामिनावर सुटका होताच त्याने पुन्हा सतत दूरध्वनी व एसएमएस करून श्रुतीला त्रास देणे सुरूच ठेवले. या प्रकारास कंटाळून सोमवारी तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या. तिला घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. गुरुवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सहकार्य केले नसल्यानेच ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप श्रुतीचे मामा लक्ष्मीकांत गडगे यांनी केला. आरोपी दोनदा जामिनावर सुटल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले जात आहे, मात्र प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार डोंगरे यांचे मत आहे.