मुंबई व पुणे या शहरांमध्ये रंगणाऱ्या ‘कॉलेजियन्स’च्या पार्टीची छाया आता विकासाच्या बाबतीत या दोन शहरांसह ‘सुवर्ण त्रिकोण’ म्हणून गवगवा होत असलेल्या तिसऱ्या शहरावर म्हणजे नाशिकवरही पडू लागली आहे. देशातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असणाऱ्या त्र्यंबकेश्वर परिसरातील ग्रीन व्हॅली रिसॉर्टमध्ये गुरुवारी आयोजित याच स्वरूपाच्या पार्टीत महाविद्यालयातील तरुण-तरुणींनी बेधुंद होत चांगलाच धुडगूस घातला. विशेष म्हणजे या पार्टीत काही शाळकरी मुलांचाही समावेश होता. या पार्टीविषयी पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाने अनभिज्ञता दर्शविली असली तरी हा प्रकार उघड झाल्यानंतर गुन्हादेखील दाखल करण्यात आला नाही. दरम्यान, झालेल्या प्रकाराबद्दल रिसॉर्टच्या व्यवस्थापनाने बिनशर्त दिलगिरी व्यक्त केली आहे.
त्र्यंबकेश्वरच्या तळवाडे परिसरात ग्रीन व्हॅली या आलिशान रिसॉर्टमध्ये रुद्राक्ष नामक संस्थेने या पार्टीचे आयोजन केले होते. शालेय परीक्षा देणारे अन् महाविद्यालयात नुकतेच प्रवेश करणाऱ्या म्हणजे १६ ते १७ वयोगटांतील तरुण-तरुणींनी त्यात उत्साहाने सहभाग घेतला. अतिशय तोकडे कपडे अन् वेगळ्याच धुंदीत सहभागी झालेल्या तरुणांच्या गोंधळाने रिसॉर्टमध्ये उपस्थित काही कुटुंबवत्सल नागरिकांना धक्काच बसला. परिसरातील ग्रामस्थांनीही रिसॉर्टमध्ये नेहमीच अशा स्वरूपाच्या पाटर्य़ा होत असल्याचे गाऱ्हाणे मांडले आहे.
नाशिकपासून २८ किलोमीटर व त्र्यंबकेश्वरपासून पाच किलोमीटरवर असलेल्या या रिसॉर्टमध्ये आयोजित पार्टीची निमंत्रणे सांकेतिक भाषेत देण्यात आली. कोणाच्या ई-मेलवर तर कोणाच्या भ्रमणध्वनीवर. त्यातही तरुणांकडून प्रत्येकी १५०० रुपये आकारताना संयोजकांनी युवतींना मात्र मोफत प्रवेश दिल्याचे सांगितले जाते. चिल्लर पार्टीत शहरातील काही नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी हजेरी लावली. वसूल केलेल्या प्रवेश शुल्कात खाणे अमर्याद ठेवण्यात आले तर ड्रिंक्ससाठी जादा दर आकारण्यात आले. भरदुपारी पार्टी सुरू झाल्यानंतर अवघ्या काही तासांत मुलांनी रिसॉर्टचा ताबा घेत डीजेच्या तालावर थिरकण्यास सुरुवात केली. सर्व नियम पायदळी तुडवत बेफाम झालेल्या तरुणाईने पार्टीत अमली पदार्थाचाही स्वाद घेतला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. जल्लोषात साजऱ्या झालेल्या पार्टीसाठी परवानगी घेतली होती की नाही ते स्पष्ट झालेले नाही. पार्टीचे आयोजक कोण, हेदेखील गुलदस्त्यात आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, या प्रकाराविषयी ओरड सुरू झाल्यावर रिसॉर्टच्या व्यवस्थापनानेही घडलेला प्रकार धक्कादायक असल्याचे मान्य करून यापुढे तरुणांच्या पाटर्य़ाना परवानगी दिली जाणार नसल्याचे म्हटले आहे. रिसॉर्टमध्ये काही तासांसाठी एका इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुपने महाविद्यालयीन तरुणांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते, परंतु त्यात काही अतिउत्साही तरुणांच्या कृत्यामुळे ही पार्टी लगेच गुंडाळण्यात आल्याचे रिसॉर्टच्या व्यवस्थापनाने म्हटले आहे.