भ्रष्टाचारविरोधी कार्यासाठी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाने यंदाचा आंतरराष्ट्रीय अखंडता पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना जाहीर केला आहे. हजारे यांच्यासह लंडनमधील ग्लोबल वीटनेस ही स्वयंसेवी संस्था आणि अफगाणिस्तानमध्ये मानवी हक्कासाठी काम करणा-या डॉ. सीमा समर यांच्याही नावांची घोषणा या पुरस्कारासाठी करण्यात आली आहे.
अलार्ड प्राईज या नावाने देण्यात येणा-या या आंतरराष्ट्रीय अखंडता पुरस्कारासाठी ४८ देशांमधून १०० हून अधिक नामांकने करण्यात प्राप्त झाली होती. त्यातून अंतिम तीन नावांची निवड करण्यात आल्याची घोषणा ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाने केल्याची माहिती हजारे यांच्या कार्यालयाचे समन्वयक दत्ता आवारी यांनी दिली. १ लाख डॉलरच्या मुख्य पुरस्कारासह प्रत्येकी २५ हजार डॉलरचे दोन सहपुरस्कार देण्यात येणार असून दि. २५ सप्टेंबर रोजी कॅनडातील व्हँकुवर शहरातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात पुरस्कार वितरण होणार आहे.
हजारे हे गेल्या २५ वर्षांपासून भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या माध्यमातून भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात निकराने लढा देत आहेत. त्यांच्या चळवळीतून महाराष्ट्रात अनेक कायदे अस्तित्वात आले. सन २०११ पासून हजारे यांनी जनलोकपालच्या मागणीसाठी राष्ट्रीय पातळीवर भ्रष्टाचारविरोधी आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शांततेच्या मार्गाने करण्यात आलेल्या देशव्यापी आंदोलनाचे यशस्वी नेतृत्वही हजारे यांनी केले. याची दखल कायद्याचे शिक्षण देणा-या कॅनडातील आघाडीच्या ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाने घेतली आहे.  
पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर अण्णांनी त्याविषयी प्रतिक्रिया देताना म्हटले की, आंतरराष्ट्रीय अखंडत्व अलार्ड पुरस्कारासाठी निवड झाल्याची बातमी आनंद देणारी आहे. गेली २५ वर्षे सातत्याने सत्तेचे विकेंद्रीकरण, विकास प्रक्रियेत लोकसहभाग वाढविणे व भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत. अशा पुरस्काराने भ्रष्टाचारविरोधी चवीला आणखी बळ  मिळेल. हजारे यांना आजपर्यंत केअर पुरस्कार (अमेरिका-१९९८), पारदर्शकता पुरस्कार (दक्षिण कोरिया-२००३) आणि जीत गील पुरस्कार (जागतिक बॅंक-२००७) या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.