Parbhani : परभणीतील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याच्या निषेधार्थ बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. बंदचे आवाहन करत असंख्य युवक रस्त्यावर आल्यानंतर शहरातील मध्यवर्ती भागात तणाव निर्माण झाला. शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. संतप्त जमावाने एसटी बसवरही दगडफेक केली. दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा आदेश दिल्यानतंर परिस्थिती निवळली. मात्र, रात्रीही पोलिसांकडून कोबिंग ऑपरेशन झाल्याचं म्हटलं जातंय. यावर पोलिसांनी खुलासा केला आहे.
“काल ही परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांनी काही लोकांची धरपकड केली होती. त्यात ५० लोकांना आम्ही अटक केली होती. त्यामुळे रात्री कोंबिंग ऑपरेशन करून कार्यकर्त्यांना अटक केली नाही. रात्री परिस्थित नियंत्रणात आणतानाच अटक केली होती. रात्री कोंबिंग ऑपरेशन झालं नाही”, असं स्पष्टीकरण आज पोलिसांनी माध्यमांना दिलं.
हेही वाचा >> Prakash Ambedkar : परभणी बंदला हिंसक वळण; प्रकाश आंबेडकरांचा इशारा, “२४ तासांत हल्लेखोरांना अटक करा अन्यथा..”
मंगळवारी सायंकाळी घडलेल्या अनुचित प्रकारानंतर बुधवारी आंबेडकरी संघटनांच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आले होते. बंददरम्यान अनेक दुकानांवर, वाहनांवर दगडफेक करण्यात आली. पोलीस आणि आंदोलकांमध्ये अनेक ठिकाणी संघर्ष झाल्याचे पाहायला मिळाले. बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी परिवहन महामंडळाकडून परभणी आगारातून एकही बस सोडण्यात आली नव्हती. आजही पोलिसांच्या सूचनेनुसार परभणीत संचारबंदी लागू करण्यात आली असून तणावपूर्वक शांतता आहे.
आमदार-खासदारांकडून शांततेचे आवाहन
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्याचे आवाहन खासदार संजय जाधव, आमदार राहुल पाटील यांनी केले आहे. संविधान प्रतिकृतीच्या अवमानाच्या घनटेचा दोघांनीही निषेध खेला असून आरोपीला अटक केल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करण्यात आयावी, असी मागणी केली आहे. आमदार पाटील यांनी समर्थक कार्यकर्त्यांसह शहराच्या वेगवेगळ्या भागांत फिरून शांततेचे आवाहन केले.
काय घडलं परभणीत?
परभणीत संविधानाच्या प्रतिची विटंबना करण्यात आल्याची घटना मंगळवारी घडली. त्यानंतर परभणीत आज बंदची हाक देण्यात आली. या दरम्यान बंदला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलनकांनी काही दुकानांवर दगडफेक केली आणि पोलिसांच्या काही गाड्यांवरही दगड फेकले. ज्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. पोलिसांनीही या आंदोलकांवर सोम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळालं असून शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
x