माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील जाहीर सभेला आपल्या समर्थकांसह गरहजेरी दाखवून आमदार रामप्रसाद बोर्डीकरांनी आपणास आघाडीचा धर्म मान्य नसल्याचे दाखवून दिले. मात्र, बोर्डीकरांच्याच मतदारसंघात काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांची सभा घेऊन राष्ट्रवादीने बोर्डीकरांच्या नकारात्मक भूमिकेला छेद देण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आघाडीचा धर्म पाळत व्यासपीठावर सातत्याने एकत्र दिसत असतानाच परभणीत मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारात बोर्डीकर यांनी अजूनही सहभाग नोंदवला नाही. बोर्डीकर व भांबळे यांच्यातील राजकीय वैर जुनेच असले, तरी आता सगळीकडे आघाडीचा धर्म पाळला जात असताना व दोन्ही काँग्रेसचे नेते स्थानिक पातळीवर एकत्र येण्याची ताकीद देत असताना बोर्डीकर अजूनही भांबळे यांच्या प्रचारापासून अलिप्त आहेत. बोर्डीकरांचा पवित्रा अपेक्षित असला, तरी त्यांच्या भूमिकेचे पडसाद उमटू लागले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत परभणीत झालेल्या जाहीर सभेत त्यांनीही बोर्डीकरांचे नाव न घेता चूक दुरूस्त करण्याचे आवाहन केले. चुका होतात, पण दुरुस्त करण्याचा दिलदारपणा दाखवायला हवा. तुम्ही आज आमच्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली, तर विधानसभेला तुमच्याबद्दल चांगला विचार करू, असे पवार या सभेत म्हणाले होते. त्याचाही बोर्डीकरांवर कोणताच परिणाम झाला नाही.
सेलू येथील जाहीर सभेत चव्हाण यांनी भांबळेंच्या पाठीशी काँग्रेस भक्कम उभी असल्याचे सांगितले. स्वत:च्याच मतदारसंघात आघाडीची प्रचारसभा होत असताना या मतदारसंघाचे आमदार मात्र सभेला गरहजर राहतात, ही बाब उपस्थितांच्या नजरेतून सुटली नाही. बोर्डीकरांसह त्यांचे समर्थक नगराध्यक्ष पवन आडळकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष नामदेव डख, सेलू पालिकेचे ४ नगरसेवक सभेला गरहजर होते. बोर्डीकर यांच्या भूमिकेत आता कोणताही बदल होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सेलूतील सभेत काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी देशपातळीवर काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आहे. नेत्यांनीच एकत्र येण्याची भूमिका स्वीकारल्याने आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्यात स्थानिक पातळीवर भांडण लागले आहे. असे असताना भांबळे यांच्यासाठी आम्ही हा विरोध पत्कारला, असे जाहीरपणे सांगून टाकले. राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी याच व्यासपीठावर काँग्रेसची मंडळी गळ्यात भगवा रुमाल घालून सेनेचा प्रचार करीत असल्याचे चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले.
चव्हाण यांनी भाषणात बोर्डीकरांच्या अनुपस्थितीचा उल्लेख केला नसला, तरी त्यांचा पवित्रा त्यांनाही खटकला असावा. भांबळे यांच्या पाठीशी राहा, अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी या सभेत केले. बोर्डीकरांची नकारात्मक भूमिका असतानाही चव्हाण यांच्या उपस्थितीत बोर्डीकरांच्याच मतदारसंघात जाहीर सभा घेऊन राष्ट्रवादीने मात्र ‘याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याविना’ ही भूमिका घेतली आहे.
‘याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्याविना’!
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मतदारसंघातील जाहीर सभेला आपल्या समर्थकांसह गरहजेरी दाखवून आमदार रामप्रसाद बोर्डीकरांनी आपणास आघाडीचा धर्म मान्य नसल्याचे दाखवून दिले.
First published on: 04-04-2014 at 01:10 IST
TOPICSअशोक चव्हाणAshok Chavanकाँग्रेसCongressनिवडणूक २०२४ElectionपरभणीParbhaniराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCP
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Come with you not come without you