Comedian Kunal Kamra Summoned By Mumbai Police : कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यासाठी त्याला समन्सही बजावण्यात आलं. पण तो चौकशीसाठी पोहचलाच नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर म्हटलेल्या वादग्रस्त गाण्यामुळे कुणाल कामरा पुन्हा चर्चेत आला आहे. तसंच कुणाल कामराने सोमवारी रात्री उशिरा चार पानी पोस्ट करत माफी मागणार नाही म्हटलं होतं. तसंच पोलिसांना सहकार्य करेनही म्हटलं होतं. पण तूर्तास तरी त्याने सहकार्य केलेलं नाही हेच दिसून येतं आहे.
मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला बजावलं समन्स
मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावलं होतं आणि चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र कुणाल कामरा हजर राहिला नाही. खार पोलीस ठाण्यात सकाळी ११ वाजता बोलवलं होतं. मात्र कुणाल कामरा अनुपस्थित राहिला.
कुणाल कामराविरोधात कुठल्या कलमांखाली गुन्हा दाखल?
कुणाल कामराविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ३५३ (१) ब, ३५३ (२) आणि ३५६ (२) बदनामी या कलमांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्यात कुणाल कामराविरोधात पहिली पोलीस तक्रार दाखल झाली. त्यानंतर हा गुन्हा झीरो एफआयआर म्हणून खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
कुणाल कामराने काय केलं?
कुणाल कामराने मुंबईतल्या काँटीनेंटल हॉटेलमध्ये एक शो केला होता. ज्यामुळे त्याने एकनाथ शिंदेंच्या विरोधात गाणं रचत ते म्हटलं होतं. त्याने कुठेही एकनाथ शिंदेंचं नाव घेतलं नाही. पण तो ज्या प्रकारे त्याने वर्णन केलं आहे त्यावरुन ते गाणं एकनाथ शिंदेंवरच होतं हे स्पष्ट झालं आहे. या घटनेनंतर त्याच्याविरोधात गुन्हे दाखल झाले तसंच ज्या हॉटेलमध्ये त्याने हा शो केला त्याचीही तोडफोड शिवसैनिकांनी केली. कुणाल कामरा हा सोमवारपासून मुंबईत नाही. मात्र त्याने सोमवारी रात्री एक पोस्ट लिहिली ज्यात त्याने मी कुणालाही घाबरलेलो नाही तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागणार नाही असं म्हटलं होतं. तसंच पोलिसांना सहकार्य करणार असंही जाहीर केलं होतं. मात्र आता तो पोलीस चौकशीला जायला तयार नाही. त्याने एक चार पानी पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये त्याने पोलिसांना सहकार्य करेन म्हटलं होतं.
कुणाल कामराने पोस्टमध्ये काय म्हटलं होतं?
मी पोलिसांना पूर्ण सहकार्य करण्याचं ठरवलं आहे. पोलिसांनी आणि न्यायालयाने माझ्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी. मात्र कायदा सर्वांसाठी समान असतो त्यामुळे अशाही लोकांविरोधात कारवाई झाली पाहिजे ज्यांनी ते हॉटेल फोडलं. एक जोक ऐकून त्यांनी हॉटेल फोडलं आहे. तसंच जे निवडून आलेले नाहीत अशा महापालिका सदस्यांच्या विरोधातही कारवाई झाली पाहिजे. हॅबिटट या ठिकाणी तोडफोड करायला ते कुठलीही नोटीस न देता हातोडे घेऊन कसे आले? असे प्रश्न कुणाल कामराने विचारले आहेत.
मला असंख्य कॉल आले आहेत
माझा फोन नंबर लिक केला गेला आहे. त्यानंतर मला असंख्य कॉल आले आहेत. आता मी ते व्हॉईस मेलवर फॉरवर्ड केले आहेत. मीडियाला माझं सांगणं आहे की तुम्ही जे काही कव्हर करत आहात आणि बातम्या करत आहात ना त्याआधी एक बाब लक्षात ठेवा की पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत आपल्या देशाचा क्रमांक १५९ वा आहे.
अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची माफी मागणार नाही
मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही. मी कुणालाही घाबरत नाही. मी माझ्या पलंगाखाली लपून बसलेलो नाही. असंही कुणाल कामराने म्हटलं आहे.
दरम्यान कुणाल कामरा समन्स बजावूनही चौकशीसाठी पोहचला नाही. त्यामुळे त्याला आणखी एक समन्स बजावलं जाण्याची शक्यता आहे. कुणाल कामराने एकनाथ शिंदेंविरोधात विडंबनात्मक गाणं म्हटलं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.