मुजाहिद अहमद छत्तीसगढचा व्यापारी. दरवर्षी द्राक्षछाटणीच्या काळात महाराष्ट्रात येतो. ज्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असते, त्यांना उचल देतो. त्यांची द्राक्षे बाजारात आली की, त्याचा भाव ठरवतो आणि बागेचा व्यवहार करतो. बार्शीजवळील झरेगाव येथून सुमारे दोन कोटींचा व्यवहार दरवर्षी मुजाहिद अहमद व वकार अहमद हे करतात. या व्यवहारात या वर्षी ते चांगलेच अडचणीत आले.. द्राक्ष उचल करण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांना ८.८० लाखांची आगाऊ रक्कम दिली. ही रक्कमही त्यांनी उसनवारीवर उभी केली. द्राक्षे तोडणीस आल्यानंतर मागील महिनाभरापासून ते उस्मानाबादेत मुक्काम ठोकून होते. द्राक्ष तोडणीसाठी तयारी सुरू झाली नि गारपिटीत बागा उद्ध्वस्त झाल्या. आता द्राक्षे उचलता येणारच नाहीत आणि दिलेली उचलही शेतकऱ्यांनी खर्च केली. जसे शेतकरी अडचणीत सापडले, तसाच व्यापारही आक्रसला.
अहमद सांगत होता, ज्या शेतकऱ्याला ७० हजार रुपयांची उचल दिली, त्याची बाग केवळ ४० हजार रुपयांची झाली. पुढील हंगामाच्या भरवशावर आता तो एक लाख रुपये आगाऊ उचल मागत आहे. ती देण्याखेरीज आमच्याकडे पर्याय नाही. मागील साडेआठ लाख रुपये सोडून नव्याने १० लाख रुपये गुंतवले तर पुढचा हंगाम पदरी पडेल. या जुगारात शेतकरी जेवढय़ा संकटात सापडेल, त्यापेक्षा अधिकचे कर्ज आमचेही झाले असेल..
शेतकरी उद्ध्वस्त!..
झरेगावच्या गोरोबा जाधव या शेतकऱ्याकडे २ एकर शेती आहे. त्यावर त्यांनी द्राक्षबाग उभारली. गतवर्षी दुष्काळी स्थितीत त्यांनी ऐपत नसताना पुढील वर्षी चांगले उत्पन्न मिळेल, या आशेवर दोन लाख रुपये खर्च करून दोन बोअर घेतले. यंदाचा हंगाम तारून नेईल, असा विश्वास असतानाच निसर्गाचा फटका बसला. गावातीलच नागेश संपत एडके हेही द्राक्ष उत्पादन घेतात. त्यांच्यावर वडील व स्वत:च्या नावे मिळून ४ लाखांचे कर्ज आहे. द्राक्षबागेच्या भरवशावर हा सगळा व्यवहार केला. व्यापाऱ्यांकडून त्यांनीही ७० हजार रुपयांची उचल घेतली. सहा-सात लाखांचे उत्पन्न निघणारी द्राक्षबाग केवळ ४० हजार रुपयांचे उत्पन्न देऊन गेली. त्यामुळे पुरता भ्रमनिरास झाला. आता बँकेने त्यांना कर्ज भरण्यासाठी नोटीस पाठविली. महावितरण वीजबिलासाठी, खत-औषध विक्रेता उधारीसाठी तगादा लावत आहे. अशा स्थितीत काय करायचे, हा प्रश्न त्यांना पडला आहे. अशीच व्यथा झरेगावच्या वालचंद संकपाळ, विनायक जाधव, संजय जाधव, सिद्धेश्वर एडके या शेतकऱ्यांची.