वसई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मुंबई, नवी मुंबई आणि मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील २२२ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी दुपारी काढण्यात आले. यामध्ये मुंबईतील १७३ नवी मुंबईतील १९ तर मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ३६ पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकीच्या अनुषांगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने बदल्यांबाबत पोलीस महासंचालकांना निर्देश दिले होते. त्यानुसार एकाच आयुक्तालयात दोन जिल्हे असतील आणि त्यातील ज्या पोलीस अधिकार्‍यांना ३ वर्षे पूर्ण झाली असतील अशा पोलिसांची बदली करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले होते. मुंबई, नवी मुंबई आणि मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात दोन जिल्हे येतात. त्यामुळे या पोलीस आयुक्तालयातील ३ वर्ष पूर्ण झालेल्या पोलिसांची यादी पोलीस आयुक्तांनी मागवली होती. बुधवारी दुपारी विशेष पोलीस महानिरिक्षक (आस्थापन) के. एम. प्रसन्ना यांनी या बदल्यांचे आदेश काढले. त्यात मुंबई (१७३) मिरा भाईंदर वसई विरार (३६) आणि नवी मुंबईतील (१९) पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे.

हेही वाचा…“राजकारणातील सर्व पुतण्यांचा डीएनए सारखाच” म्हणणाऱ्या छगन भुजबळांना राज ठाकरेंचा टोला; म्हणाले, “त्यांनी आता…”

१९ पोलीस ठाण्यातील १५ प्रमुखांच्या बदल्या

मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील ३६ पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या मुंबईत करण्यात आल्या आहेत. आयुक्तालयात एकूण १९ पोलीस ठाणी आहेत. त्यातील १५ पोलीस ठाण्याच्या प्रमुखांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात संजय हजारे (मांडवी), जितेंद्र वनकोटी (पेल्हार) राजू माने (माणिकपूर) रमेश भामे (नायगाव), विलास सुपे (नया नगर), राहुल पाटील (काशिगाव), चंद्रकांत सरोदे (मिरा रोड) प्रफुल्ल वाघ (भाईंदर), विजय पवार (विरार), रणजीत आंधळे (वसई) राजेंद्र कांबळे (काशिमिरा) बाळासाहेब पवार (आचोळे) सदाशिव निकम (नालासोपारा) जयराव रणावरे (वालीव) शैलेंद्र नगरकर (तुळींज) आदी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे.