सांगली : महापालिका क्षेत्रात नव्याने होणारी कर आकारणीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नसून, शासन निर्णयानुसार मिळकतीचे सर्व्हेक्षण करूनच आकारणी करण्यात आली असल्याचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी गुरुवारी नागरिक व सामाजिक संस्थांच्या बैठकीत स्पष्ट केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय समितीच्या अहवालानंतरच या करआकारणीची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, या कर आकारणीला लोकांनी विरोध दर्शवला आहे.
गुरुवारी महापालिकेच्या सभागृहात मिळकतधारक, सामाजिक संस्था प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी आयुक्त गुप्ता यांनी प्रशासकीय बाजू कथन केली. त्यांनी सांगितले, शासन निर्णयानुसार महापालिका क्षेत्रातील मिळकतीचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. सर्व्हेक्षणानंतरच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे सर्व्हेक्षण करण्यात आले. सदरचे सर्व्हेक्षण ड्रोनद्वारे करण्यात आले. जागेवर असलेल्या परिस्थितीनुसार करआकारणीच्या नोटिसा बजावण्यात आल्या. या नोटिसावर हरकती मागवण्यात आल्या आहेत.
मात्र, या करआकारणीला मिळकतधारकांनी विरोध दर्शवला असून, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शंभोराज काटकर यांनी विरोध कायम राहील, अशी भूमिका जाहीर केली. महापालिकेत तत्कालीन नगरसेवकांनी करआकारणीचा विषय पटलावर न ठेवता व चर्चेविना मंजूर केल्याचा आरोप त्यांनी केला.