नवे महसूल आयुक्तालय परभणीला स्थापन करण्यात यावे, या मागणीने आता जोर धरला असून, आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीने आयुक्त उमाकांत दांगट यांच्याशी शनिवारी चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला. दरम्यान, आयुक्तालयाच्या मागणीसाठी बुधवारी (१५ जुलै) परभणीत सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
परभणीला नवे महसूल आयुक्तालय व्हावे या मागणीने आता व्यापक रूप धारण केले आहे. यापूर्वी झालेल्या धरणे आंदोलनात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी मोठा सहभाग नोंदवला होता. आमदार डॉ. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रश्नी परभणीकरांची बाजू मांडण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यानंतर संघर्ष समितीने आता आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. बुधवारी सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. टप्याटप्याने हे आंदोलन पुढे नेण्याचा निर्धार संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आला आहे.
दरम्यान, मराठवाडा विभागाचे आयुक्त उमाकांत दांगट यांची भेट शिष्टमंडळाने घेतली. १९९६ मध्ये मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मंडळाचा ठराव घेऊन दुसरे आयुक्तालय परभणीलाच स्थापन करण्यात यावे अशी शिफारस राज्यपालांकडे केली होती असे मुद्दे या वेळी आ. डॉ. पाटील यांनी मांडले. भौगोलिकदृष्टय़ा परभणी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने आयुक्तालय परभणीतच व्हावे अशी आग्रही मागणी या वेळी शिष्टमंडळाने केली. भविष्यातल्या सर्वपक्षीय मोर्चासह विविध आंदोलनांची माहितीही या वेळी आयुक्तांना देण्यात आली. आयुक्तांशी समाधानकारक चर्चा झाल्याचा दावा आ. डॉ. पाटील यांनी केला.

Story img Loader