जत तालुक्यातील ४२ गावांच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. तातडीने उपाययोजना करुन आपली गावे दुष्काळमुक्त करण्यात येतील, असा दिलासा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी रविवारी येथे झालेल्या बठकीवेळी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील ग्रामस्थांना दिला. विकासकामांकडे दुर्लक्ष होत असल्याने जत तालुक्यातील काही गावांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिल्याने या बठकीला महत्त्व प्राप्त झाले होते.
येथील शासकीय विश्रामधाममधील राजर्षी शाहू सभागृहात जत तालुक्यातील ४२ गावांच्या पाणी प्रश्नाबाबत समन्वयासाठी बठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये परिवहन मंत्री दिवाकर रावते बोलत होते. या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, सांगली जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संजय िशदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिवतारे म्हणाले,‘नव्याने प्रस्तावित करण्यात येत असलेल्या या ४ योजनांमध्ये सध्या असणाऱ्या कालव्याची लांबी वाढवून ८ गावांना पाणी व सुमारे ४ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ होईल. माडग्याळसह आठ गावांना सिंचनाचा लाभ देण्यासाठी जत कालवा क्रमांक ८० ते ७२६ या पुढे १६ कि. मी. चा कालवा काढण्यात येईल. त्यामुळे  सुमारे ३७६२ हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ होईल. जत तालुक्यातील वंचित पूर्व भागातील ४० गावांना प्रभावी पध्दतीने सिंचनाचा लाभ देण्यासाठी जत कालवा हा पुढे ९० कि. मी. वाढविण्यात येणार आहे. त्याचा ४० गावांना व १८ हजार ५४२ हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ होईल. म्हैसाळ प्रकल्पावर असणाऱ्या सर्व उपसासिंचन योजनांमधून १०० टक्के ठिबक सिंचन होण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळे या ४० गावांचा पाणी प्रश्न सुटेल. उर्वरित २४ गावांना सिंचनाचा लाभ देण्यासाठी कोणतेंवबोबलाद, निगडी खुर्दे, वाशान, खोजणवाडी, या ४ उपसासिंचन योजना राबविण्यात येतील. म्हैसाळ योजनेच्या व्याप्तीत बदल करुन ६४ गावांना व १३ हजार २८ हेक्टर जमिनीला त्याचा लाभ देण्यात येईल. या भागातील पाझर तलावांचे पुनर्भरण करण्यात येईल, तसेच शिवजल क्रांती योजना राबविण्यात येईल, असेही शिवतारे यांनी सांगितले. अन्य तालुक्यांच्या तुलनेत जत तालुक्याचाही विकास केल्यास तेथील जनता कदापी परराज्यात जाणार नाही, असे सांगितले. बठकीला सरपंच, नागरिक, जलसंपदा, जलसिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.