गांधीनगर येथील वादग्रस्त जागेवर राष्ट्रपुरुषाचा अज्ञाताने उभारलेल्या पुतळ्यामुळे निर्माण झालेल्या वादावर सोमवारी काही काळासाठी पडदा पडला आहे. दलित नेते व गांधीनगर व्यापारी प्रतिनिधींच्या बैठकीत पाच जणांची समिती नेमण्यात आली. या समितीचा समन्वयाचा तोडगा निघेपर्यंत पुतळा आहे त्या जागेवर ठेवून व्यापाऱ्यांनी आपला व्यवहार पुन्हा सुरू करावा, असा निर्णय घेण्यात आला. तो मान्य करत व्यापारी प्रतिनिधींनी बंद मागे घेणार असल्याचे घोषित केले, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गांधीनगर येथील मुख्य शिरू चौकात सात दिवसांपूर्वी अज्ञाताने वादग्रस्त जागेत राष्ट्रपुरुषाचा पुतळा उभारला होता. मुख्य चौकात रहदारीच्या ठिकाणी आणि वादग्रस्त जागेत पुतळा उभारल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी यावर आक्षेप घेत हा पुतळा येथून स्तलांतरीत करावा, अशी मागणी करत बंद पुकारले. गेली सात दिवस बंद असल्याने कोटय़वधींचा व्यवहार ठप्प होता. याबाबत मोर्चा आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. याची दखल घेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासकीय विश्रामगृहावर व्यापारी प्रतिनिधी, आरपीआय नेते व प्रशासनाची बठक आयोजित केली होती. त्याची माहिती मंत्री पाटील यांनी पत्रकार परिषदे दिली.
ते म्हणाले, गांधीनगर येथे वादग्रस्त जागेवर राष्ट्रपुरूषाचा पुतळा उभारल्याने वाद निर्माण झाला. याबाबत प्रशासनाने आतताईपणे निर्णय घेतला असता तर प्रश्न चिघळला असता. याचा विचार करून व्यापारी प्रतिनिधी, दलित नेते व प्रशासन यांची बठक घेण्यात आली. यामध्ये पाच जणांची समन्वय समिती नेमण्यात आली. समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. तसेच पुतळा कोणी बसविला याचीही सखोल चौकशी होईल. समितीने यानंतर अहवाल सादर करायचा आहे. असा निर्णय घेण्यात आला. या समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी प्रशांत पाटील आहेत. तर आर. पी.आय. चे शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, व्यापारी प्रतिनिधी भजनलाल ढेबडा, शंकरशेठ दुलाणी यांचा सदस्य म्हणून सहभाग आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर व योग्य तोडगा काढेपर्यंत पुतळा आहे त्या जागेवर ठेवणे, तसेच व्यापाऱ्यांनी बंद मागे घ्यावा, असा निर्णय घेण्यात आला.
भजनलाल ढेबडा यांनी समितीवर आमचा विश्वास आहे. त्यांचा जो काही निर्णय असेल त्यावर आमचा विश्वास आहे. तेव्हा आम्ही बंद मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
पत्रकार परिषदेस आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, भाजपचे शहराध्यक्ष महेश जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, भगवान काटे, गांधीनगरच्या माजी सरपंच पूनम परमानंदाणी, सरपंच लक्ष्मी उदासी, राकेश सचदेव, जितू लालवाणी, मनोजी बचवाणी, रमेश तणवाणी आदींसह व्यापारी, दलित संघटनांचे कार्यकत्रे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
दरम्यान गांधीनगर येथील वादग्रस्त जागेत उभारलेला राष्ट्रपुरुषाचा पुतळा स्तलांतरीत करावा, या मागणीसाठी स्थानिक व्यापाऱ्यांनी आज-सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. या संदर्भातील निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले आहे.  

Story img Loader