वाघिणीची मृत पिल्ले, मृत महिला व घटनास्थळी मिळालेली विष्ठा या तिन्हीची डीएनए चाचणी करून वाघिणीचा शोध घेतला जाणार असून, यासाठी वनविकास महामंडळ (एफडीसीएम) व ८ वनाधिकाऱ्यांची समिती गठीत करून वाघिणीच्या शोध मोहिमेला वेग देण्यात आला आहे. दरम्यान, मंगळवारी वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान व एफडीसीएमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून बऱ्याच गोष्टींची नोंद घेतली. बेपत्ता वाघिणीचे नाव टी ५ असे आहे.
रविवार, २७ डिसेंबरला पाथरी वनपरिक्षेत्रात वाघिणीची चार पिल्ले मृतावस्थेत सापडली होती. त्यांची आई मात्र बेपत्ता आहे. वनखात्यात खळबळ उडविणाऱ्या या घटनेनंतर वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान, एफडीसीएमचे जीआरके राव, साईप्रसाद, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, डोळे या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन अनेक गोष्टींची नोंद घेतली. यावेळी झालेल्या संयुक्त बैठकीत वाघिणीच्या शोधासाठी वनखाते व एफडीसीएमच्या आठ अधिकाऱ्यांची संयुक्त समिती गठीत करण्यात आली. यात वनखात्याचे विभागीय अधिकारी धाबेकर, एफडीसीएमचे राजपूत, सहायक व्यवस्थापक बिराडे, सहायक उपवनसंरक्षक मोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी मोरे, कापसे, राठोड, पाथरी व सावलीचे ठाणेदार, माजी मानद वन्यजीव रक्षक उदय पटेल, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांचा समावेश आहे.
वनखात्याच्या दोन दिवसांच्या मॉनिटरिंगमध्ये घटनास्थळी वाघाच्या पायाचे ठसे दिसलेले आहे. मात्र, ते टी-२ या वाघाचे आहेत, असे तेथील वन कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे टी-२ हा वाघ घटनास्थळी आतापर्यंत बरेचदा आला असून त्यावरून हा वाघ म्हणजे मृत पावलेल्या पिल्लांचा बाप असावा, असाही वनखात्याचा अंदाज आहे. बेपत्ता वाघिणीचे नाव टी-५, असे आहे. ती बऱ्याच दिवसांपासून या भागात दिसलेली नसल्याने तिचा मृत्यू झाला असावा, असाही वनखात्याचा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा