राज्यातील दलित अत्याचारांच्या वाढत्या घटनांसंदर्भात विचार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकारी समितीची बैठक लवकरच होणार असल्याचे रोजगार हमी मंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले. जिल्ह्य़ातील नानेगाव, खडकी व बाबुलतारा या गावांत झालेल्या दलित-सवर्ण संघर्षांच्या पाश्र्वभूमीवर ते बोलत होते.
राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी. एस. थुल यांच्यासोबत राऊत यांनी शुक्रवारी या तीन गावांना भेट दिली. नानेगावची घटना ३ एप्रिलला घडली. गुन्हा मात्र ५ मे रोजी दाखल झाला. त्यामुळे सकृतदर्शनी या विलंबाबद्दल शंका येते. गुन्ह्य़ातील साक्षीदारांना संरक्षण देण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत. दलितांवर अलीकडच्या काळात झालेल्या अत्याचाराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. गृह खात्याच्या बैठकीतही या अनुषंगाने आढावा घेण्यात आला.
अनेक सामाजिक कार्यकर्ते शेती, सिंचन, शिक्षण आदी विषयांवर मते व्यक्त करतात. परंतु दलितांवरील अत्याचाराबाबत का बोलत नाहीत, असा सवालही राऊत यांनी या वेळी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या संदेशानुसार ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला ते प्रगती करीत आहेत. आता मातंगांना शिक्षणाचे महत्त्व कळत असल्याने त्यांना अडविण्याचे प्रयत्न सनातनी मंडळी करीत आहेत, असेही ते म्हणाले.
थुल म्हणाले की, नानेगावचे सरपंच मनोज कसाब यांचा विकासाचा मार्ग अनेकांना आवडत नव्हता. साक्ष-पुरावे बदलणार नाहीत याची काळजी या प्रकरणात पोलिसांनी घेतली पाहिजे. कसाबच्य वडिलांच्या शेती संदर्भातील प्रश्नात मदत केली जाईल. गेल्या फेब्रुवारीत परतूर तालुक्यात खडकी येथे आशाबाई नाईकनवरे या चर्मकार महिलेस मारण्यात येऊन तिने गळफास घेतल्याचे भासविले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असून चार आरोपींना अटक झाली. या घटनेमागील कारणांचा तपास चालू आहे. परतूर तालुक्यातील बाबुलतारा गावात आंबेडकर जयंती मिरवणुकीवर हल्ला झाला. तसेच देवीची मूर्ती ओटय़ावरून काढून टाकली, म्हणून दलितांविरुद्ध गुन्हा दाखल झाले. या गावास भेट देऊन माहिती घेण्यात आली, असेही थुल यांनी सांगितले.

Story img Loader