राज्यातील ग्रंथालयांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा निर्णय दीर्घ काळ चालत असलेल्या ग्रंथालयांच्या चालकांनी घेतला आहे.     चिपळूण येथील लोकमान्य टिळक वाचन मंदिर (लोटिस्मा) हे ग्रंथालय यंदा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरे करत आहे.
त्या निमित्त राज्यभरातील शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ शंभर वर्षांपेक्षा जास्त वष्रे चालत असलेल्या, ‘शतायु’ ग्रंथालयांचे अधिवेशन गेल्या ९ ते ११ जानेवारी या काळात चिपळुणात झाले. राज्यात एकूण ८७ शतायु ग्रंथालये असून त्यांपैकी सुमारे ५० गं्रथालयांचे पदाधिकारी-प्रतिनिधी अधिवेशनात सहभागी झाले. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, धुळे वाचनालय, रघुनाथ खटखटे वाचनालय (शिरोडा), वल्लभभाई बालाजी वाचनालय (जळगाव), लोकमान्य वाचनालय (जामखेड), उर्दु लायब्ररी (मालेगाव), राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय (वाशिम) इत्यादींचा त्यामध्ये समावेश होता.   
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात ‘शतकोत्तर ग्रंथालयांची वाटचाल व समस्या’ या विषयावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये उपस्थित प्रतिनिधींनी या ग्रंथालयांना भेडसावणाऱ्या विविध समस्या मांडल्या. ग्रंथालयांना दोन वष्रे न मिळालेले अनुदान, त्यांच्या वर्गामध्ये आवश्यक बदल, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, विस्तारीकरणासाठी आर्थिक साहाय्य, ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून मिळणारी वागणूक इत्यादी मुद्दय़ांचा त्यामध्ये समावेश होता. राज्य ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष मनोज गोगटे, विनायक गोखले (ठाणे), बी. डी. गायकवाड (सोलापूर) इत्यादींनी त्यामध्ये भाग घेतला. हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने शासनदरबारी प्रयत्न करण्याची सूचना पुढे आली.
त्यानुसार राज्यातील सर्व शतायु ग्रंथालयांशी संपर्क साधून समन्वय समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीचे सदस्य मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत, अशी माहिती ‘लोटिस्मा’चे  कार्यकारी अध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

Story img Loader