कोणत्याही एका व्यक्तीने देशाला पुढे नेले, असे म्हणणे चुकीचे असल्याचे सांगत देशात झालेली विकासकामे ही सामान्य जनतेने केली आहेत, असे विधान कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी भिवंडीमध्ये जाहीर सभेत केले. एक व्यक्ती देशाला पुढे नेऊ शकत नाही, असे सांगत राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.
ते म्हणाले, भाजपचे नेते तीन महिन्यात विकास करू असे सांगत आहेत. मात्र, गेल्या ६० वर्षांत देशात जो विकास झाला, तो कोणी केला. कोणत्याही एका व्यक्तीने देशाला पुढे नेले आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. देशातील सर्वसामान्य जनतेने देशात विकास घडवून आणला आहे. कोट्यवधी जनतेने हा विकास घडवून आणला आहे. भाजपला मात्र सामान्य जनतेची किंमत नाही, असाही आरोप त्यांनी केला.
लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढायला हवे. सर्वसामान्यांचे हात आणखी बळकट करण्यासाठी कॉंग्रेसने माहिती अधिकार, शिक्षण हक्क, अन्नसुरक्षा, लोकपाल यासारखे कायदे आणल्याचा पुनरुच्चारही राहुल गांधी यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

Story img Loader