भल्याभल्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचे भाव काहिसे खाली येण्याच्या मार्गावर असल्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असला तरी पुढील महिन्यात तो पुन्हा एकदा सर्वाना रडवणार असल्याचे गृहितक या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले आहे. कारवाईच्या धास्तीने सध्या साठविलेला सर्व कांदा विक्रीसाठी आणण्याचा कल असून त्यामुळे पुढील महिन्यात कोणाकडेही कांदा शिल्लक राहण्याची शक्यता नाही. नवीन कांदा ऑक्टोबरच्या मध्यावर बाजारात येतो. मात्र तोपर्यंत स्थिती बिकट होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे.
दुष्काळामुळे उन्हाळ कांद्याची आवक दरवर्षीच्या तुलनेत बरीच कमी झाली आहे. या स्थितीत देशांतर्गत बाजारातून मागणी वाढत असल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले. मुंबईसह देशातील प्रमुख महानगरांमध्ये प्रति किलो ६० ते ८० रुपयांपर्यंत हा भाव गेल्यामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आले. याची झळ आगामी   निवडणुकीत बसू शकते, याची जाणीव झालेल्या केंद्र व राज्य शासनाने साठेबाजांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला.
या घडामोडींमुळे धास्तावलेले शेतकरी व व्यापारी साठविलेला सर्व माल बाजारात आणण्याची धडपड करीत आहेत. याचा परिणाम पहिल्याच दिवशी घाऊक बाजारातील भाव प्रति क्विंटलला १२०० रूपयांनी कोसळण्यात झाला. पुढील काही दिवस हे सत्र कायम राहिल्यास भाव आणखी खाली येतील. किरकोळ बाजारातही तो किफायतशीर दरात उपलब्ध होईल. परंतु, हा अल्पकालीन दिलासा ठरणार आहे. साठवणूक केलेला माल काही दिवसात संपुष्टात येईल आणि नवीन कांदा बाजारात येण्यास ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. या दरम्यानच्या काळात विचित्र स्थितीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.
राज्यात सातारा जिल्ह्यातून सर्वप्रथम नवीन कांदा बाजारात येतो. त्या परिसरात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याचा परिणाम कांदा उत्पादनावर होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील नवीन कांदा सर्वसाधारणपणे १५ ऑक्टोबरनंतर बाजारात येऊ लागतो. याचा विचार केल्यास सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्यापर्यंत म्हणजे दीड महिना बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता कुठून होईल, असा प्रश्न नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी उपस्थित केला. भाव घसरल्यामुळे निर्यातदारांनी कांदा निर्यातासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
सद्यस्थितीत निर्यातीसाठी किमान भाव ६५० डॉलर असून निर्यातदार कमी झालेल्या भावाचा लाभ उचलत निर्यातीच्या दृष्टिकोनातून पावले टाकत आहेत. सध्या कर्नाटक व आंध्रप्रदेशमधून नवीन कांद्याची आवक हळूहळू सुरू झाली आहे. परंतु, ही दोन्ही राज्य संपूर्ण देशाची कांद्याची गरज भागवू शकत नाहीत. याची परिणती त्यावेळी भाव यापेक्षा वेगळी उंची गाठतील, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

Story img Loader