परभणी : दहा वर्षापूर्वी केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर अल्पसंख्याकांना लक्ष्य करून धार्मिक ध्रुवीकरणाचा नारा देत हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जात आहे. तोच अजेंडा तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतरही भाजप आणि ‘आरएसएस’ने राबवणे सुरू केले असून त्यांना संविधानावर चालणाऱ्या देशाचे हिंदूराष्ट्र निर्माण करायचे आहे. संविधानाने दिलेले अधिकार नष्ट करण्याचे काम भाजप प्रणित केंद्र सरकार करत आहे अशी टीका माकपच्या पॉलिट ब्युरोचे केंद्रीय समन्वयक कॉ. प्रकाश कारत यांनी केली.
परभणी जिल्ह्यातील सेलू येथील साई नाट्यगृहात आज गुरुवारपासून (दि.२७) भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या (मार्क्सवादी) चोवीसाव्या राज्य अधिवेशनाला प्रारंभ झाला आहे. माकपच्या पॉलिट ब्युरोचे केंद्रीय समन्वयक कॉ. प्रकाश कारत यांनी या अधिवेशनाचे उद्घाटन केले. यावेळी पॉलिट ब्युरोचे सदस्य कॉ. निलोत्पल बसू, डॉ. अशोक ढवळे, माकपचे राज्यसचिव उदय नारकर, स्वागत समितीचे अध्यक्ष यु. आर. थोंबाळ, रामकृष्ण शेरे पाटील, उद्धव पौळ, दत्तूसिंग ठाकूर, रामेश्वर पौळ आदी उपस्थित होते. हे अधिवेशन तीन दिवस चालणार आहे.
आपल्या भाषणात कारत म्हणाले, लोकसभा निवडणुकीत देशभरात धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक मंच उभा केला. त्याला चांगले राजकीय यश मिळाले. भाजपला स्पष्ट बहुमत गाठता आले नाही. चारशेपेक्षा जास्त जागा मिळवल्यानंतर देशाचे संविधान बदलणे आणि हिंदूराष्ट्र निर्माण करणे हीच या लोकांची मनीषा होती. आताही धार्मिक ध्रुवीकरण करून हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जात असून बड्या भांडवलदारांचे हित जोपासले जात आहे. सर्वच केंद्रीय यंत्रणांचा प्रचंड प्रमाणात गैरवापर केला जात आहे. विरोधकांना तुरुंगात टाकायचे काम सुरू आहे. देशात जिथे भाजपशासित राज्य सरकारे आहेत अशा ठिकाणी धार्मिक उत्सवांचा गैरवापर केला जात आहे. अशी टीकाही यावेळी कारत यांनी केली. भारतीय जनता पक्षाला हरवायचे असेल तर देशभरात डाव्यांची ताकद वाढायला हवी. जोवर डाव्या पक्षांचा जनाधार वाढणार नाही तोवर हिंदुत्ववादी शक्तींशी संघर्ष करता येणार नाही असेही यावेळी त्यांनी सांगितले.
राज्य सचिव उदय नारकर यांनी भाजप आणि ‘आरएसएस’ला मनुवादी विचारसरणीच्या आधारे हिंदूराष्ट्र प्रस्थापित करायचे आहे, त्यामुळे देशातील लोकशाहीवादी नागरिकांना संविधान वाचवण्याची लढाई आता लढावी लागेल असे प्रतिपादन केले. परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीला उध्वस्त करण्याचे कारस्थान केले गेले. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्या तेव्हा आरोपींना सत्ताधाऱ्यांचे आशीर्वाद होते पण आता तर कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधाऱ्यांच्या हाती असलेल्या यंत्रणांचा वापर होत आहे असा आरोप यावेळी नारकर यांनी केला. शहिदांना अभिवादन करून व पक्षाचे झेंडावंदन करून या अधिवेशनाला सुरुवात झाली. राज्यभरातून मोठ्या संख्येने प्रतिनिधी व कार्यकर्ते या अधिवेशनासाठी आलेले आहेत.