संवेदना यात्रेद्वारे योगेंद्र यादव यांचा शेतकऱ्यांशी संवाद
दुष्काळाची तीव्रता मुंबई, दिल्लीत बसून कळणार नाही. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेऊन समाजाने आपली संपूर्ण ताकद शेतकऱ्यांच्या पाठीशी लावण्याची गरज आहे, असे प्रतिपादन किसान संवेदना यात्रेचे प्रमुख प्रा. योगेंद्र यादव यांनी केले.
मराठवाडय़ातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यास आलेल्या प्रा. यादव यांनी सोमवारी पालम येथे भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. सुभाष लोमटे, प्रा. विजय दिवाण, ब्रिगेडियर सुधीर सावंत, माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी, हर्ष मंदर, अनिलकुमार मौर्य, मनीषकुमार, डी. एस. शारदा, डॉ. अमोलसिंग, साथी रामराव जाधव, भाऊसाहेब भोसले आदी उपस्थित होते.
मी इथल्या शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेण्यासाठी आलो आहे. तुमचे ऐकण्यासाठी आलो आहे, बोलण्यासाठी नाही. भाषणबाजीसाठी खूप लोक आहेत आणि त्यातून देशाचे कोणतेही कल्याण होत नाही. संवेदना यात्रा शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेण्यासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. कितीही आपत्ती आली तरीही शेतकऱ्यांनी आपला आत्मविश्वास गमावू नये, खचून जाऊ नये असे आवाहन यादव यांनी केले. पालम येथील शेतकऱ्यांनी यादव यांच्यासमोर आपले प्रश्न मांडले.

आपल्याला भूकंप किंवा अन्य आपत्ती दिसते, पण दुष्काळ दिसत नाही. तो अदृश्य असतो. अशा वेळी समाज, देश आणि सरकार अशा सर्व घटकांनी मिळून एकत्र येण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे दु:ख समजून घेत हे दु:ख दूर करण्यासाठी सर्वानीच पुढे आले पाहिजे. शेतकऱ्यांच्या दु:खाशी आपले नाते आहे, असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. देशातील किमान ५० कोटी जनता आज दुष्काळाचा सामना करीत असून, सरकार मात्र या विषयावर गंभीर नाही.
– योगेंद्र यादव, संवेदना यात्रेचे प्रमुख

Story img Loader