सध्या सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती जाणवत आहे, परंतु या दुष्काळापेक्षा सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्यामुळे त्याचे अधिक संकट शेतकऱ्यांसमोर आहे, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केले. शिंदखेडा तालुक्यातील सारवे येथे मंगळवारी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष रवी देवांग हेही उपस्थित होते. शेतकऱ्यांची एकूणच स्थिती, दुष्काळ व सरकारी धोरण या सर्व मुद्दय़ांचा जोशी यांनी परामर्श घेतला. दुष्काळ निर्माण होण्यास सरकारची धोरणे कारणीभूत आहेत. योग्य धोरणांअभावी ही परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी थेट परदेशी गुंतवणूक आवश्यकच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालास भाव मिळेल, माल साठविण्यासाठी मोठय़ा प्रमाणात गोदामांची निर्मिती होईल, त्यामुळे विविध माध्यमातून परदेशी गुंतवणूक शेतकऱ्यांसाठी फायदेशीरच ठरणार आहे, असेही मत त्यांनी मांडले. समाजवाद नष्ट होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांसमोर अनेक समस्या असल्या तरी त्या सर्व समस्यांचे उत्तर शेतकरी संघटनेमार्फत मिळू शकेल. संघटनेचे मूल्य आज किंवा उद्या सरकारच्याही ध्यानी नक्कीच येईल, असा विश्वासही जोशी यांनी व्यक्त केला.

Story img Loader