शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नसून, माजी आमदार सदाशिव लोखंडे व माजी मंत्री बबनराव घोलप यांचे चिरंजीव योगेश या दोघांपैकी एकाचे नाव निश्चित केले जाणार आहे. उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांत नाराजी आहे.
माजी मंत्री घोलप यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. पण त्यांना शिक्षा झाल्याने पेच तयार झाला. उच्च न्यायालयातून शिक्षेला स्थगिती मिळाल्यास उमेदवारी करता येईल, असे घोलप यांनी सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांना सांगितले. सोमवारी दिवसभर ते न्यायालयीन प्रक्रियेत होते. पण स्थगिती मिळू शकली नाही.
घोलप यांनी मुलगा योगेश याला उमेदवारी मागितली आहे. सेनेत त्याला विरोध होत आहे. काही पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात ठाकरे यांची भेट घेऊन लोखंडे यांना उमेदवारी द्यावी, असे सुचविले. पण घोलप हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. त्यांनी शिर्डीत उमेदवारी मागितली नव्हती. त्यांना उमेदवारी करण्यास सांगण्यात आले. आता घाई केली तर घोलप नाराज होतील, त्यांच्या पाठीशी शिवसेना नाही असा संदेश जाईल, त्याचा परिणाम नाशिकच्या निवडणुकीवरही होईल. त्यामुळे विचार करूनच निर्णय घेतला जाणार असून त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यास विलंब केला जात आहे. घोलप यांनीही अप्रत्यक्षरीत्या सेनानेतृत्वावर दडपण आणणे सुरू केले आहे.
नाशिक येथील बैठकीत लहू कानडे, लोखंडे व योगेश घोलप यांची नावे सुचविण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ ठाकरे यांना भेटले तेव्हा त्यांनी घोलप यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका व्यक्त केली. त्यांच्या चिरंजीवाला उमेदवारी देण्याचा विचार असल्याचे सांगितले. मात्र उमेदवारी दिली नाहीतर रिपब्लिकन पक्षाचे अशोक गायकवाड यांच्या नावाचा विचार केला जाईल, असे स्पष्ट केले. सेनेचे संपर्कप्रमुख सुहास सामंत, सेनानेते अनिल देसाई, आमदार अशोक काळे यांनी ठाकरे यांची भेट घेऊन लोखंडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यानंतर ठाकरे यांची लोखंडे यांनी भेट घेतली. या वेळी लोखंडे यांना निवडणुकीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले. आता उमेदवारीच्या स्पर्धेत केवळ लोखंडे व योगेश घोलप हीच नावे राहिली आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा