विधानसभेचे वेध लागताच नगर शहरात समस्यांचे निमित्त करून आंदोलनासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. काल रात्री बसस्थानकाजवळील इम्पिरिअल चौकात टेम्पोची धडक बसून एकाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर चौकातच रात्री शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकापाठोपाठ रास्ता रोको आंदोलने केली.
शनिवारी रात्री आठच्या सुमारास बसस्थानक चौकात टेम्पोची धडक बसून सुरेश आसाराम कारंडे (वय ५५, रा. मोहिनीनगर, केडगाव) यांचा जागीच मृत्यू झाला. गंज बाजारातील दुकान बंद करून कारंडे एम-८० या दुचाकीवरून घराकडे चालले होते. पुण्याकडे भरधाव वेगात जाणा-या टेम्पोने (एमएच १६ एएस ७२२७) त्यांना धडक दिली. अपघातानंतर वेळेत पोलीस न आल्याने वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.
अपघातानंतर लगेचच काही वेळात आ. अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिका-यांनी तेथे रास्ता रोको आंदोलन केले. उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी लागावा, जड वाहतूक शहराबाहेरून वळवावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. शहरप्रमुख संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, अनिल शिंदे आदी सहभागी झाले होते. जिल्हाधिका-यांनी दूरध्वनीवरून आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर लगेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नगरसेवक विपुल शेटिया यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन सुरू केले. उड्डाणपुलाच्या कामात शिवसेनेकडून अडथळा आणला जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. जिल्हाधिका-यांनी यासंदर्भात बैठक बोलावली असल्याची माहिती पोलिसांनी दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
गेल्या महिन्यात सोशल मीडियावरून राष्ट्रीय महापुरुषांची बदनामी करण्यात आल्याच्या घटनेवेळीही शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या वेळी एका पाठोपाठ रास्ता रोको आंदोलन केले होते व मोर्चे काढले होते. त्याची पुनरावृत्ती काल झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा