सरकारी सेवेत तीन टक्के आरक्षण असूनही योग्य मार्गदर्शनाअभावी उच्च अधिकारी पदापर्यंत पोहचण्यासाठी अंध, अपंगांना येत असलेले अपयश दूर करण्यासाठी येथे जुलैपासून गरजूंसाठी मोफत निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येत आहे. अशा प्रकारचे हे महाराष्ट्रातील बहुदा पहिलेच केंद्र असणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शारीरिकदृष्टय़ा समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करून त्यांना ध्येय प्राप्तीसाठी सर्व प्रकराचे सहकार्य केले जाणार आहे.
२००५ पासून शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागात कार्यरत दीपस्तंभ फाऊंडेशनने या केंद्रासाठी पुढाकार घेतला आहे. या केंद्रात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी संस्थेने परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. २८ जून रोजी राज्यातील सर्व जिल्ह्य़ांमध्ये अंध, अपंग पदवीधर विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत १० वी पर्यंतच्या ज्ञानावर आधारित प्रश्न असतील. या परीक्षेतून १०० विद्यार्थ्यांची निवड निवासी मार्गदर्शन केंद्रात करण्यात येईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वर्षभर केंद्रीय लोकसेवा, महाराष्ट्र लोकसेवा या आयोगांच्या परीक्षांसह बँक, रेल्वे आदी स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन दिले जाईल. अंधांसाठी उच्चस्तरीय स्पर्धा परीक्षांचे सर्व संदर्भ साहित्य ब्रेल लिपीत तयार करण्याचे काम सुरू असून ही सर्व पुस्तके ध्वनिमुद्रित स्वरुपातही तयार केली जात आहेत. फाऊंडेशनला यासाठी नॅशनल असोसिशन फॉर ब्लाईंड, स्पर्शज्ञान, सावित्री फोरम, सक्षम, ज्ञान प्रबोधिनी, सिनर्जी, एनआयव्हीएच या संस्थांचे सहकार्य लाभत आहे. या अंतर्गत ब्रेल वाचनालयही सुरू करण्यात येणार असून या प्रकल्पात सहकार्य करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहनही इतर संस्थांना फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. २०११ पासून महाराष्ट्रातील गरीब, होतकरू तसेच निराधार अशा २०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना वर्षभर स्पर्धा परीक्षांचे विनामूल्य प्रशिक्षण देणाऱ्या या संस्थेचा हा उपक्रमही यशस्वी होईल, असा विश्वास संस्थेचे प्रमुख यजुर्वेंद्र महाजन, प्रकल्प व्यवस्थापक लक्ष्मण सपकाळे यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकल्पास या क्षेत्रातील ज्येष्ठ निरंजन पंडय़ा, नसीमा हरजूक, डॉ. तात्याराव लहाने आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.
अंध, अपंगांसाठी जळगावमध्ये निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
सरकारी सेवेत तीन टक्के आरक्षण असूनही योग्य मार्गदर्शनाअभावी उच्च अधिकारी पदापर्यंत पोहचण्यासाठी अंध, अपंगांना येत असलेले अपयश दूर करण्यासाठी येथे जुलैपासून गरजूंसाठी मोफत निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येत आहे.
आणखी वाचा
First published on: 08-06-2015 at 02:43 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competitive exam guidance for disabled in jalgaon