राष्ट्रवादीचे नगरसेवक बाळासाहेब बोराटे व काँग्रेसचे नगरसेवक संजय लोंढे या दोघांनी पक्षादेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार करून या दोघांचे पद रद्द करावी, अशी मागणी दोन्ही पक्षांच्या मनपातील गटनेत्यांनी महसूल विभागीय महसूल आयुक्तांकडे केली आहे. गटनेत्यांच्या वतीने वकील प्रसन्ना जोशी यांनी मंगळवारी हा अर्ज दाखल केला. तूर्त या नगरसेवकांना पदावरून तातडीने निलंबित करावे असाही स्वतंत्र अर्ज दाखल करण्यात आला आहे.
नुकत्याच झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराला मदत करण्यासाठी पक्षादेश झुगारून खोटय़ा कारणानिशी मतदानाच्या वेळी गैरहजर राहिल्याचा ठपका बोराटे व लोंढे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मनपातील राष्ट्रवादीचे गटनेते समद खान व काँग्रेसचे गटनेते संदीप कोतकर यांच्या वतीने वकील जोशी यांनी हा अर्ज दाखल केला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत बोराटे व लोंढे हे दोघेही गैरहजर होते. त्यांच्या रजेचा अर्जही विरोधी शिवसेनेचे गटनेते संजय शेंडगे यांनीच या सभेत सादर केला होता. हाच ठपका ठेवून दोन्ही काँग्रेसने या दोन नगरसेवकांवर कारवाई सुरू केली आहे.
विभागीय आयुक्तांकडे दाखल करण्यात आलेल्या अर्जात म्हटले आहे, की दि. ८ जूनला झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत बोराटे व लोंढे हे दोघेही गैरहजर होते. या निवडणुकीत कोणतेही कारण न देता हजर राहून राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांना मतदान करण्याबाबतचा व्हीप बजावण्यात आला होता. बोराटे हे मनपातील राष्ट्रवादी प्रणीत शहर विकास आघाडीचे व लोंढे हे काँग्रेसचे नोंदणीकृत सदस्य आहेत. या दोघांना टपालाने व्हीप बजावण्यात आला होता. त्यांच्या घरावरही तो डकवण्यात आला होता. मात्र त्यांनी व्हीप झुगारला. हे दोघेही महापौर निवडीच्या वेळी गैरहजर राहिले. त्यांची ही कृती महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियमातील तरतुदी व कायद्याचा भंग करणारी आहे. ती लक्षात घेऊन त्यांचे नगरसेवकपद तातडीने रद्द करावे, तसेच खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हेही दाखल करावेत, अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा