महायुतीचे उमेदवार व त्यांचे सहकारी जाणीवपूर्वक राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. पद्मसिंह पाटील व नेते शरद पवार यांच्याविरोधात अर्वाच्च भाषा वापरून चिखलफेक करीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. अश्लील भाषेचा वापर करून तणाव निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महायुतीचे उमेदवार व त्यांचे कार्यकत्रे जाणीवपूर्वक राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींबाबत अर्वाच्च भाषा वापरत आहेत. समाजातील नागरिकांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उमेदवार डॉ. पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उचकावून व सामाजिक शांतता भंग होऊन तंटे व्हावेत, त्यातून होणाऱ्या दंग्यांचा निवडणुकीसाठी उपयोग करून घेण्याचा महायुतीचे नेते व कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. त्याचाच भाग म्हणून उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे सोमवारी सायंकाळच्या सभेत मंचावर बसलेल्या एकाने महायुतीचे उमेदवार रवींद्र गायकवाड यांच्या हातात चिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन अश्लील भाषेचा वापर करीत टीका केली.
महायुतीच्या उमेदवाराने ५ वष्रे जनसंपर्क ठेवला नाही. तसेच सेनेचे जिल्हाध्यक्ष असताना जनतेच्या कोणत्याच प्रश्नावर कधी आंदोलन केले नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जनतेशी संवाद साधण्यास कोणतेच मुद्दे शिल्लक नाहीत. म्हणूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करावी, त्यानंतर त्या घटनेचे भांडवल करावे, असा कट महायुतीच्या कार्यकर्त्यांसह नेतेमंडळींनी रचला असल्याचा आरोप निवेदनात केला आहे. अशाही स्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, तरीही काही दुष्कृत्य घडल्यास त्याला राष्ट्रवादीचे उमेदवार किंवा पक्ष जबाबदार राहणार नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर रेवणसिद्ध लामतुरे यांची सही आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा