शहराच्या सावेडी उपनगरातील शिलाविहार भागातील चार इमारती बेकायदा मार्गाने पाडल्या जात असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. यासाठी बिल्डरने पोलीस संरक्षणात जेसीबी आदी साहित्य आणल्याने तेथील ५० कुटुंबांत आज तणाव निर्माण झाला होता. रहिवाशांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतल्याने सुरुवातीला संशयास्पद भूमिका घेणाऱ्या तोफखाना पोलिसांनी या संदर्भात दोन्ही बाजूंच्या लोकांना उद्या (सोमवारी) कायदेशीर कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेचे अधिकाऱ्यांचेही बिल्डरशी संगनमत असल्याचा रहिवाशांचा आरोप आहे.
शिलाविहार भागातील वीर सावरकर मार्गावर या चार इमारती आहेत. या इमारतीमधील रहिवासी महेश गिडवाणी, दिलीप बोरा, अनिल तांदळे, नरेश व्होरा, जुनेर खान, अरोरा, रवि काळे, अहलुवालिया, संजय गुप्ता, सनी तांदळे आदींनी जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांची भेट घेऊन पोलीस संरक्षणात बेकायदा इमारती पाडल्या जात असल्याची तक्रार केली.
यासंदर्भात माहिती देताना रहिवासी गिडवाणी यांनी सांगितले, की इमारती बळकावण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही ५० कुटुंबे गेल्या ३० वर्षांपासून या इमारतीत राहात आहोत, खरेदीखत झाले आहे, त्याची नोंदणी झाली आहे. नियमित पाणीपट्टी व मालमत्ता कर भरतो. बिल्डर माणिकशा हाथीदारू यांनी दीपक सावंत यांना मुखत्यारपत्र करून दिले आहे. सावंत आज जेसीबी घेऊन इमारत पाडण्यासाठी आले होते. आम्ही मनपाच्या परवानगीने इमारतीची डागडुजी केली, तरीही मनपाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून इमारत मोडकळीस आल्याच्या नावाखाली पाडण्याचा प्रयत्न आहे.
या प्रभागातील नगरसेवक निखिल वारे यांनी सांगितले, की मनपाची नोटीस चुकीची आहे. शहर अभियंत्यांची भूमिकाही संशयास्पद आहे. अनेक वर्षे राहात असलेली इमारत पाडणे बेकायदा आहे. बिल्डरने मालकी हस्तांतरित न केल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दीपक सावंत यांच्या म्हणण्यानुसार इमारत धोकादायक झाल्याने मनपाने ती उतरून घ्या अशी नोटीस दिली आहे. इमारतीत रहिवाशांऐवजी घुसखोर राहात आहेत. इमारत उतरवून घेण्याच्या कामात राजकारणी लोक अडथळा आणत आहेत.
इमारती पाडण्याच्या प्रयत्नाची तक्रार
शहराच्या सावेडी उपनगरातील शिलाविहार भागातील चार इमारती बेकायदा मार्गाने पाडल्या जात असल्याची रहिवाशांची तक्रार आहे. यासाठी बिल्डरने पोलीस संरक्षणात जेसीबी आदी साहित्य आणल्याने तेथील ५० कुटुंबांत आज तणाव निर्माण झाला होता.
First published on: 10-11-2014 at 03:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint of trying to demolish the buildings