बारावीच्या द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाच्या संगणक शास्त्र विषयातील प्रश्न चुकले असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारींची शहानिशा करून प्रश्न चुकीचे असल्यास ते प्रश्न सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण दिले जातील, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले.
बारावीच्या द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाची संगणक शास्त्र विषयाची परीक्षा सोमवारी होती. या पेपरमधील काही प्रश्न चुकले असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या मदत क्रमांकावर केली आहे. सोमवारी आणि मंगळवारी मदत क्रमांकांवर याबाबत विद्यार्थ्यांचे कॉल येत असल्याचे पुणे विभागातील समुपदेशकांनी सांगितले आहे. द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतील ४ प्रश्न चुकीचे असल्याचे विद्यार्थी आणि संगणक शास्त्र विषयाच्या शिक्षकांचे म्हणणे आहे. प्रश्न क्रमांक १ मधील ए व बी, प्रश्न क्रमांक २ मधील ए (बी) आणि प्रश्न क्रमांक ४ मधील ‘बी ’हा उपप्रश्न चुकीचा असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. तर हे प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचेच आहेत अशी तक्रारही काही विद्यार्थ्यांनी केली आहे. याबाबत विद्यार्थ्यांकडून आलेल्या तक्ररी संगणक शास्त्र विषयाच्या नियामक मंडळाकडे पाठवण्यात आल्या असल्याचे समुपदेशकांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा