खामगाव येथील जलंब नाका परिसरातील डॉ. प्रवीण पाटील यांच्या रुग्णालयातील सहाय्यक डॉक्टराने उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या पत्नीची शारीरिक छेडखानी करून तिचा विनयभंग केल्याचे उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे हे रुग्णालय महिलांसाठी असुरक्षित असल्याचे सिध्द झाले असून याप्रकरणी पोलिसांनी डॉ. प्रवीण पाटील यांच्या सहकाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
डॉ. चंद्रकांत उर्फ गोलू शामराव गायकवाड (२३, रा. सामान्य रुग्णालय क्वॉर्टर, खामगाव) असे हे कृत्य करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. तो केला नगरातील डॉ. प्रवीण पाटील अॅक्सिडेंट व आय केअर हॉस्पिटलमध्ये सहाय्यक डॉक्टर आहे.
याबाबत असे की, सुटाळा येथील पीडित महिलेचा पती लग्नसमारंभासाठी गेला. मोटारसायकल अपघातात जखमी झाल्याने ती महिला अपघातग्रस्त पतीला उपचारासाठी डॉ. पाटील यांच्या दवाखान्यात घेऊन गेली. गेल्या १७ फेब्रुवारीपासून तिच्या पतीवर उपचार सुरू होते. काल रात्री रुग्णालयातील स्पेशल खोलीत ही महिला पती व मुलासह झोपली होती, मात्र या रुग्णालयातील खोल्यांना आतून कडीकोंडाच नसल्याने पीडित महिलेने दाराला आतून दोरीने बांधले. दरम्यान, काल मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास डॉ. चंद्रकांत गायकवाड हा त्या खोलीत आला. त्याने पीडित महिलेचे तोंड दाबून तिची शारीरिक छेडछाड करून दुसऱ्या खोलीत चल, असे म्हटले. यामुळे भयभीत झालेल्या या महिलेने आरडाओरड केली. यावेळी जागे झालेल्या पती व इतर रुग्णांनी डॉ. गायकवाड यास पळून जातांना पाहिले. दरम्यान, या महिलेने शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून डॉ. चंद्रकांत गायकवाडविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घृणास्पद घटनेप्रसंगी आरोपी मद्यधुंद असल्याचे समजते. दरम्यान, या हॉस्पिटलबद्दल व तेथील रुग्णसेवेबद्दल जनमानसात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा