तालुक्यातील पळशी येथे दस-याच्या दिवशी झालेल्या दलित तरुणाच्या खुनामागे एकटी महिला नसून आणखी दोन आरोपी असल्याची तक्रार मयत तरुणाची पत्नी, वडील तसेच भावाने पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. इतर आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर त्वरीत कारवाई न झाल्यास ३ नोव्हेंबरपासून पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा साळवे कुटुंबीयांनी निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, पाथर्डी तालुक्यातील जवखेडे येथील दलित कुटुंबाच्या निर्घृण हत्येनंतर पळशी येथील दलित कुटुंबानेही तरुणाच्या खुनाविषयी संशय व्यक्त केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी एका महिलेस अटक करण्यात आली असून तिने खुनाची कबुलीही दिली आहे. तसे परिस्थितीजन्य पुरावे आपल्याकडे असल्याचे पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांनी सांगितले.
    पळशी येथील संतोष महादू साळवे व वैशाली बबन बिलबिले यांचे अनतिक संबंध होते. दोन महिन्यांपासून दोघांचे प्रेमसंबंध जुळल्यानंतर वैशाली ही गरोदर राहिली. पोटात गर्भ वाढू लागल्याने गर्भपात करण्याची मागणी वैशाली ही करीत होती. त्यावरून दोघांमध्ये वादावादी सुरू होती. संतोष हा पहारेकरी म्हणून काम पाहात होता. संतोष हा गर्भपातास नकार देत असल्याने दस-याच्या दिवशी वैशाली ही त्याच्या कामाच्या ठिकाणी गेली. तेथे संतोष व वैशाली यांच्यात जोरदार भांडण झाले. या भांडणातून वैशाली हिने तेथे असलेली लाकडी फळी संतोष याच्या डोक्यात मारली व त्यात संतोष याचा मृत्यू झाला. त्याबाबत पोलिसांनी सुरुवातीस दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर आणखी तपासाअंती वैशाली हिने संतोष याचा खून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी वैशाली हिला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता तिने खुनाची कबुली दिली. वैशालीने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांनी परिस्थितीजन्य पुरावे ताब्यात घेऊन वैशाली हिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला.
    ही घटना घडून महिना उलटत आल्यानंतर मयत संतोष याची पत्नी सुनंदा, वडील महादू यादव साळवे तसचे भाऊ शरद यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करून या खुनामागील कारणे वेगळी आहेत. घटनास्थळावरील लाकडी फळी पाहता एकटी महिला ती उचलून मारणे शक्य नाही. त्यामुळे या महिलेने दिलेली खुनाची कबुली हा बनाव आहे. या खुनामागे आणखी दोघे असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर जातीयवादी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. हे आरोपी मोकाट राहिल्यास संपूर्ण कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली असून आमच्या कुटुंबास न्याय न मिळाल्यास ३ नोव्हेंबरपासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

Story img Loader