राज्यात दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होत असून, रुग्णसंख्येतही मोठी घट झाली आहे. मात्र, असं असलं तरी राज्यातील काही जिल्ह्यांतील परिस्थिती अद्यापही चिंतेत भर घालणारीच आहे. राज्यातील काही जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढीचं प्रमाण जास्त आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा समावेश असून, याच मुद्द्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील परिस्थितीबद्दल केंद्रीय आरोग्य पथकाने चिंता व्यक्त केली आहे. केंद्रीय पथकाने कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्याचा दौरा केला. दोन्ही जिल्ह्यातील पाहणी केंद्रीय पथकाने केली. त्याचबरोबर दोन्ही जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण कडक लॉकडाउन लावण्याचा सल्लाही केंद्रीय पथकाने दिला आहे. केंद्रीय पथकाने दिलेल्या सल्ल्यावरून आता निलेश राणे यांनी सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांना हटवण्याची मागणी केली आहे.

निलेश राणे यांनी ट्वीट करत जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जिल्हा वाचवायचा असेल, तर जयंत पाटील यांना पालकमंत्री पदावरून हटवा, असं माजी खासदार राणे यांनी म्हटलं आहे. “सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील मैदानात उतरले, आता करोना आटोक्यात येणार, अशा बातम्या सातत्यानं काही महिन्यापूर्वी चालत होत्या. मागच्या आठवड्यात एक सर्वे झाला, त्यामध्ये सांगली जिल्ह्यात परत कडक लॅाकडाउन करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे… पालकमंत्री बदला जिल्हा वाचवा”, अशी टीका राणे यांनी केली आहे.

सांगली जिल्ह्यातील १७४ गावांमध्ये निर्बंध

सांगली जिल्ह्यातील करोनाचे २५ हून अधिक रुग्ण असलेल्या १७४ गावांतील निर्बंध आणखी कठोर करण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी रुग्ण संख्या जादा आहे त्या भागास प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करून आवक जावक करण्यास मनाई करण्यात आली असून या निर्णयाची अंमलबजावणी रविवारपासून करण्यात आली आहे. यामध्ये इस्लामपूर, आष्टा शहरासह बोरगाव, साखराळे, बनेवाडी, मसुचीवाडी, ताकारी, गोटखिंडी, मर्दवाडी, मिरजवाडी, कामेरी, येडेनिपाणी, तुजारपूर, शिरटे, अहिरवाडी, तांबवे आदी गावांचा समावेश आहे. तर मिरज तालुक्यातील आरग, बेडग, सुभाषनगर, मालगाव, एरंडोली, बामणोली, कवठेपिरान, माधवनगर, सलगरे, मल्लेवाडी आदी गावांचा समावेश आहे. या शिवाय तासगाव तालुक्यातील कवठेएकंद, मणेराजुरी, मांजर्डे, आरवडे, अंजनी, वडगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची, देिशग, कवठेमहांकाळ, रांजणी, लंगरपेठ, पलूस तालुक्यातील पलूस, कुंडल, रामानंदनगर, सावंतपूर, अंकलखोप, भिलवडी, बुर्ली आणि जत तालुक्यातील डफळापूर, माडग्याळ, गुळवंची, बिळूर, शेगाव, वाळेखिंडी आदी गावांचा समावेश आहे.

Story img Loader