जिल्हय़ाचा इयत्ता दहावीचा निकाल गेल्या चार वर्षांपासून उंचावत चालला आहे. यंदा ९२.९० टक्के निकाल लागला. परंतु तरीही यंदा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण व पुढील उपलब्ध शिक्षणाचे प्रमाण पाहता, नगर शहरासह जिल्हय़ात, अकरावीच्या तुकडय़ा काही प्रमाणात ओस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्या धोरणानुसार सुरू होणाऱ्या स्वयं अर्थसहायित शाळांना विद्यार्थी मिळणे दुरापास्तच होईल, अशी चर्चा शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.
दहावीचा निकाल सन २०११ मध्ये ८७.०९ टक्के (उत्तीर्ण विद्यार्थी संख्या ५६ हजार २३८), सन २०१२ मध्ये ९०.०१ टक्के (५८ हजार ७०२), सन २०१३ मध्ये ९१.८४ टक्के (६२ हजार २५७) व यंदा सन २०१४ मध्ये ९२.९० टक्के (६४ हजार १८३) असा उंचावत गेला आहे. जिल्हय़ात यंदा ६९ हजार ३८३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाव नोंदवले होते. त्यातील ६९ हजार ८८ परीक्षेला दाखल झाले. विशेष गुणवत्ता मिळवणारे १६ हजार १६१, प्रथम श्रेणीतील २६ हजार ३६९, द्वितीय श्रेणीतील १८ हजार ९८४ आहेत.
जिल्हय़ात अकरावीच्या प्रवेशासाठी ७१४ तुकडय़ांतून ६३ हजार ६०० प्रवेशसंख्या उपलब्ध आहे. यामध्ये विनाअनुदानित तुकडय़ांचाही समावेश आहे. याशिवाय गेल्या दोन वर्षांपासून सरकारने स्वयंअर्थसहायित शाळा हा नवीनच प्रकार सुरू केला आहे, गेल्या वर्षी २३ शाळांना मान्यता मिळाली, त्यातील १४ सुरू झाल्या. यंदा पुन्हा ६५ शाळांना मान्यता मिळाली, त्यातील आता नव्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नगर शहरात दोन स्वयंअर्थसहायित शाळा सुरू झाल्या. इतर शाळा यंदापासून सुरू होण्याची शक्यता होती. इतर अभ्यासक्रम, पॉलिटेक्निक, आयटीआय आदीकडे जाणारे विद्यार्थी पाहता अकरावीचे वर्ग काही प्रमाणात ओस पडण्याची शक्यता आहे.
त्यातही विद्यार्थ्यांचा ओढा काही विशिष्ट शाळा, कॉलेजकडे असतो, त्याचा परिणाम इतर संस्थांवर होत असतो. एका तुकडीसाठी ८० प्रवेशसंख्येची मर्यादा आहे. त्याव्यतिरिक्तचे प्रवेश विनाअनुदानितचे असणार आहेत. याशिवाय काही विनाअनुदानितच्या तुकडय़ाही आहेत. त्यासाठी संस्था अतिरिक्त शुल्क आकारत असतात, त्यावर शिक्षण विभागाचे नियंत्रण नाही.
नगर शहरात १०७ तुकडय़ांना व ९ हजार ८४० विद्यार्थी प्रवेशसंख्येला मान्यता आहे. यंदा नगर शहरातून ९ हजार ६७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. इतर अभ्यासक्रमांकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता नगर शहरातूनही काही तुकडय़ांचे प्रवेश ओस पडण्याचीच शक्यता आहे.
मुख्याध्यापकांची आज बैठक
अकरावीची प्रवेशप्रक्रिया राबवण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी उद्या, बुधवारी दुपारी ४ वाजता नगर शहरातील भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयात जिल्हय़ातील मुख्याध्यापक, प्राचार्याची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत प्रवेशाचे वेळापत्रक तयार केले जाणार आहे.
तालुकानिहाय निकाल
अकोले- ९३.४३ टक्के, जामखेड- ९२.६६, कर्जत- ९२.११, कोपरगाव- ९१.३५, राहाता- ९३, श्रीरामपूर- ९०.२७, नगर- ९४.७३, नेवासे- ९२.५९, पारनेर- ९५.१२, पाथर्डी-९६.२९, राहुरी- ९२.६३, संगमनेर- ९४.५३ व शेवगाव- ९३.८४.
अकरावीच्या पूर्ण जागा भरणे मुश्कील!
जिल्हय़ाचा इयत्ता दहावीचा निकाल गेल्या चार वर्षांपासून उंचावत चालला आहे. यंदा ९२.९० टक्के निकाल लागला. परंतु तरीही यंदा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण व पुढील उपलब्ध शिक्षणाचे प्रमाण पाहता, नगर शहरासह जिल्हय़ात, अकरावीच्या तुकडय़ा काही प्रमाणात ओस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
First published on: 18-06-2014 at 04:00 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complete seats filling problem for 11th std