सावंतवाडी : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार श्री अवधूत गुप्ते यांनी मळगाव हायस्कूल येथील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत आपले आजोळ असलेल्या मळगाव येथील शाळकरी मुलांना सुखद धक्का दिला. अवधूत गुप्ते मळगाव येथे आपले मामा श्री. पाटकर गुरुजी यांच्या निवासस्थानी अधून-मधून येत असतात. सिने सृष्टीत जरी यशस्वी दिग्दर्शक, संगीतकार म्हणून नाव कमावले तरी जिथे बालपण गेले त्या कोकणच्या मातीला, मळगाव गावाला ते विसरले नाहीत.
श्री अवधूत गुप्ते यांचे मामा श्री पाटकर गुरुजी गेली तीस वर्षे गरीब विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी आर्थिक मदत करतात. तोच मामांचा वारसा पुढे चालविण्यासाठी श्री अवधूत गुप्ते आपल्या परिवारासह मळगाव हायस्कूलच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. यावेळी मळगाव हायस्कूलच्या नव्याने बांधलेला कै. गोपिका बाबणी शिरोडकर रंगमंच पाहून त्यांनी अभिनंदन केले व याच रंगमंचावर आपल्याला एक दिवस कार्यक्रम करायचा आहे असे सांगत भविष्यात इथे कार्यक्रम करणार असे आश्वासित केले. त्यामुळे मळगाव हायस्कूलची मुले आणि कर्मचारी वृंद आनंदित झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षकवृंद व बांदा पानवळ कॉलेजचे प्रा. शरद शिरोडकर उपस्थित होते.