विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एक हजार बेरोजगारांना रोजगार मिळावा, या हेतूने वंदना फाऊंडेशन व संगणक प्रशिक्षणातील अग्रगण्य ‘एनआयआयटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने संगणक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्य़ातील पांढरकवडय़ात संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी व उपविभागीय अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या हस्ते नुकतेच झाले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक अनामी रॉय, एनआयआयटी नागपूर केंद्राच्या संचालिका रिना सिन्हा, ज्येष्ठ समाजसेवक रणजितसिंह चव्हाण व माजी नगराध्यक्ष अनिल तिवारी उपस्थित होते. संगणक प्रशिक्षण केंद्र व एनआयआयटीच्या माध्यमातून एक हजार शेतकरी विधवा व मुलांना संगणक प्रशिक्षण, इंग्रजी भाषेचे ज्ञान व व्यक्तिमत्त्व विकासासाठी विशेष प्रशिक्षण देण्याचे अनामी रॉय यांनी जाहीर केले. या प्रशिक्षण व ज्ञानातून आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात सुखाचे दिवस येतील, असा आशावाद रिना सिन्हा यांनी व्यक्त केला.
वंदना फाऊंडेशन व एनआयआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील दहा हजारांवर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवा व मुलांना संगणक प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. अनामी रॉय यांनी २००६ पासून विदर्भातील शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर पाठपुरावा केला. २००८ व २००९ मध्ये त्यांनी शेतकरी विधवांना ब्लँकेट व धान्याचे वाटप केले होते. २०१० पासून सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शेतकरी कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी पूर्ण वेळ काम सुरू केले. गेल्या दोन वर्षांत वर्धा व यवतमाळ जिल्ह्य़ातल शेकडो शेतकरी विधवांना उद्योगांचे प्रशिक्षण तसेच अर्थसाह्य़ देऊन उद्योग सुरू करण्यास मदत केली. वंदना फाऊंडेशनच्या पुढाकाराने शेकडो विधवा उद्योग सुरू करण्यात यशस्वी झाल्या. या केंद्रात यवतमाळ जिल्ह्य़ातील कोलाम, पारधी व मादगी समाजाच्या मुलांनाही संगणक प्रशिक्षण देण्यात येईल, असे संयुक्त उपक्रमासाठी पुढाकार घेणारे सोमया रॉय म्हणाले. कार्यक्रमाला आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा व विद्यार्थी उपस्थित होते.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील बेरोजगारांना संगणक प्रशिक्षण देणार
विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एक हजार बेरोजगारांना रोजगार मिळावा, या हेतूने वंदना फाऊंडेशन व संगणक प्रशिक्षणातील अग्रगण्य ‘एनआयआयटी’ यांच्या संयुक्त विद्यमाने संगणक प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
First published on: 08-04-2013 at 01:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Computer training to family member of suicide farmer of vidarbha