मोहन अटाळकर, लोकसत्ता
अमरावती : देशातील करोनाबाधित नवीन रुग्ण दुपटीने वाढण्याचा कालावधी दहा दिवसांवर असताना अमरावतीत मात्र आठवडाभरातच करोनाबाधितांची संख्या ६ वरून २० पर्यंत गेली आहे. आतापर्यंत तब्बल सहा रुग्ण दगावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील करोना साखळी तोडण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
गेल्या ४ एप्रिलला अमरावतीत पहिल्या करोनाबाधित रुग्णाची नोंद झाली होती. हाथीपुरा येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याचा करोनाचाचणी अहवाल सकारात्मक आला होता. १२ एप्रिलपर्यंत शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या पाचवर पोहचली. १९ एप्रिलपर्यंत म्हणजे दोन आठवडय़ानंतरही करोनाबाधित रुग्णांची संख्या सहा म्हणजे स्थिर होती. याचे समाधान आरोग्य यंत्रणा व्यक्त करीत असतानाच २६ एप्रिलपर्यंत आणखी पाच रुग्णांचे मृत्यू झाले. तेही करोनाबाधित असल्याचे मृत्यूनंतरच स्पष्ट झाले. नागरिकांनी माहिती दडवल्याने शहरातील करोना साखळी तोडता आलेली नाही, असे आता बोलले जात आहे.
आतापर्यंत शहरातील हाथीपुरा, कमेला ग्राऊंड, हैदरपुरा, पाटीपुरा, तारखेडा आणि युसूफनगर या भागात राहणाऱ्या सहा करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चार महिलांचा समावेश आहे. १९ करोनाबाधित रुग्णही याच परिसरातील आहेत. १८३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या अमरावती शहरात सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण केवळ याच ५ चौरस किलोमीटर क्षेत्रातून आढळून आले आहेत. या परिसरात २६ कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रात कुणालाही ये-जा करण्यास मनाई करण्यात आली होती. लोकांना घराबाहेर निघण्यासही मनाई होती. पण, लोक ऐकत नाहीत, विनाकारण झुंडीने बाहेर पडतात. पोलीस पथक आले की पळून जाऊन घरात लपून बसतात. पथक गेले की, पुन्हा रस्त्यावर येतात, अशी व्यथा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितली. आरोग्य सर्वेक्षण करणाऱ्या पथकांनाही माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. आता एकाच क्षेत्रातून १९ करोनाबाधित आढळून आल्याने संचारबंदीची अंमलबजावणी कठोरपणे करण्याचा निर्णय पोलीस यंत्रणेने घेतला आहे. २६ कंटेनमेंट झोन हे खोलापुरी गेट आणि नागपुरी गेट या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकवटले आहेत. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर आता ड्रोन कॅमेराच्या सहाय्याने लक्ष ठेवले जाणार आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
अमरावतीत सध्याची करोना स्थिती
एकूण सकारात्मक : २०
करोनामुक्त : ०४
मृत्यू : ०६
रुग्णालयात दाखल करोनाबाधित : १०
करोना संसर्गावर मात करण्यासाठी सर्वानी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. नागरिकांनीही स्वत:हून माहिती देण्यासाठी व तपासणीसाठी पुढे यावे. कुठलीही माहिती दडवू नये. चार रुग्ण बरे होऊन घरी परतले, ही सर्वासाठी आनंदाची बाब आहे. मात्र नव्याने करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढणे हे चिंताजनक आहे. त्यामुळे सर्वानी दक्ष राहणे गरजेचे आहे.
– यशोमती ठाकूर, पालकमंत्री, अमरावती जिल्हा.