दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत तालुक्यातील डिकसळ येथील रस्त्याचे काँक्रिटीकरण सर्व निकष धाब्यावर बसवून करण्यात आले आहे. काम पूर्ण झाल्याचा देखावा करण्यासाठी, आहे त्याच रस्त्यावर काँक्रिट ओतून अक्षरश: धूळफेक करण्यात आली आहे.
दलित वस्ती सुधार योजनेतून ४ लाख ८० हजार रूपयांचा निधी डिकसळ येथील रस्त्यासाठी मंजूर करण्यात आल्यानंतर ग्रामपंचायतीने हे काम ठेकेदाराकडे सोपविले. काम केल्याचा देखावा करून शासनाचा निधी लाटण्यात पटाईत असलेल्या या ठेकेदाराने पूर्वीच्याच रस्त्यावर काँक्रिट ओतून निधीला चुना लावण्याचा घाट घातला आहे.
काँक्रिटीकरणानंतर रस्ता खचणार नाही यासाठी रस्त्याचे सपाटीकरण करून त्यावरील माती दाबणे गरेजेचे होते. त्यानंतर त्यावर विशिष्ट जाडीच्या खडीचे दोन थर टाकून त्यावर काँक्रिट टाकणे बंधनकारक होते. ही कामे न करता ठेकेदाराने थेट काँक्रिट ओतल्याने या रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे. कामासाठी वापरण्यात आलेले सिमेंट, खडी तसेच वाळूही अतिशय निकृष्ट दर्जाची असल्याने या रस्त्यावरून एखादे अवजड वाहन एकदा जरी गेले तर हा संपूर्ण रस्ता उखडला जाईल. विशेष म्हणजे काँक्रिट ओतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठिकठिकाणाचे काँक्रिट उखडण्यास सुरूवात झाली असून अशा परिस्थितीत हा रस्ता किमान वर्षभर तरी टिकेल की नाही अशी अवस्था आहे. काँक्रिटीकरणानंतर रस्त्यावर पाणी मारणे आवश्यक असताना पाण्याचा एक थेंबही नव्हता. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नागरिकांनी रस्त्यावर पाणी टाकले. तालुक्यात इतर गावात अशा प्रकारे रस्ते करण्यात आले, त्यावेळी रस्त्यावर पाणी साठविण्यासाठी आळयांची निर्मिती करून तब्बल पंधरा दिवस रस्त्यावर चोवीस तास पाणी राहील याची काळजी घेतली गेली होती. डिकसळ येथे मात्र केवळ शासनाचा निधी लाटण्यासाठीच काम पूर्ण झाल्याचा सोपस्कार करण्यात आल्याची तक्रार करण्यात येत आहे.
कारवाईचे आश्वासन
डिकसळ येथील रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे गटविकास अधिकारी किरण महाजन यांनी सांगितले. निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराचे बिल अदा न करण्याचे आदेशही संबंधितांना देण्यात येतील असेही महाजन यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा