लक्ष्मण माने लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित महिलांची परिस्थिती भयंकर असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली. तसेच या प्रकरणी काही महिला संघटनांनी विशेषत: वर्षां देशपांडे यांनी घेतलेली भूमिका खूपच धक्कादायक असल्याचेही त्यांनी सांगितले. लक्ष्मण माने लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित महिलांची आज विद्या बाळ, अॅड. पल्लवी रेणके, हरी नरके आदींनी भेट घेतली.
पीडित महिला, आश्रम शाळेचे व्यवस्थापन व सातारा पोलीस अधीक्षकांशी विद्या बाळ व इतरांनी चर्चा केली. विद्या बाळ म्हणाल्या, जे ऐकून घेतले ते भयानक आहे. तक्रारीत जी परिस्थिती नोंदविली आहे तीही भयानक आहे. सातारा पोलीस अधीक्षक प्रसन्ना यांनाही आम्ही भेटलो. त्यांनी कायदेशीर जे असेल त्याची नोंद नक्की घेऊ, गरज पडली तर अन्यायग्रस्त महिलांची पुरवणी तक्रारही दाखल करता येईल असे त्यांनी सांगितले. आता ज्या महिलांवर अन्याय झाला आहे, त्याशिवायही अन्य अन्यायग्रस्त महिला असू शकतील. त्यांनी न घाबरता पुढे यावे. वर्षां देशपांडे यांचे आतापर्यंतचे काम खूपच चांगले आहे, पण त्यांची या प्रकरणातील मते न पटणारीच आहेत. आश्रमशाळेला भेट दिली तेव्हा तेथे माने समर्थक व विरोधक महिला होत्या. अत्याचारित महिलांनी पूर्वीच तक्रार का नाही केली व त्याच वेळी नोकरी का नाही सोडली, असे प्रश्नही काहींनी केले. सत्यशोधनासाठी आम्ही आलो असल्याने लक्ष्मण मानेंचा मुलगा भाई माने व मुलगी समता माने यांच्याशी देखील संपर्क साधला. पण ते भेटायला देखील आले नाहीत. त्यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी समर्थक महिलांना पाठवून दिले. दूरध्वनीवरून भाई माने म्हणाले, ‘आमच्या विरुद्ध कट रचला जात आहे. हा सर्व षड्यंत्राचा भाग आहे.’ यावर तेच जाणून घेण्यास आम्ही आलो आहोत असे सांगितल्यावर, भाई माने यांनी ‘तुम्हीही त्याच षड्यंत्राचा भाग बनून आला नाहीत कशावरून? यापाठीमागे राजकारण आहे.’ असा प्रश्न केला. अॅड. पल्लवी रेणके म्हणाल्या, मी परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आले आहे. माझे आणि मानेंचे काहीही मतभेद नाहीत. पण महिलांवर अन्याय, अत्याचार होत असताना याकडे आम्ही डोळेझाक करू शकत नाही. सत्य परिस्थिती लवकरच समोर येईल तेव्हा आम्ही आमची पुढील भूमिका मांडू आज फक्त सत्यशोधन करत असल्याचे त्यांनी सांगितले. या शिष्टमंडळाने सातारा शहरातील काही नागरिकांशी संवाद साधला.
साताऱ्यातील अत्याचारग्रस्त महिलांची परिस्थिती खूपच भयंकर- विद्या बाळ
लक्ष्मण माने लैंगिक अत्याचार प्रकरणातील पीडित महिलांची परिस्थिती भयंकर असून त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.
आणखी वाचा
First published on: 04-04-2013 at 03:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Condition of oppressed womens in satara is very desperate vidya bal