शिक्षणाचा उद्देश रोजगार की संस्कार?
राज्याच्या शैक्षणिक धोरणासंबंधी विचार व्यक्त करतांना गृह राज्यमंत्री आणि अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेतील आमदार डॉ. रणजित पाटील यांनी मांडलेली भूमिका आणि शिक्षणाचे ध्येय आणि उद्दिष्ट यासंबंधी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी व्यक्त केलेले विचार, यात कमालीची तफावतच नव्हे, तर परस्पर विरोधी संकल्पना व्यक्त झाल्याने कोणता विचार स्वीकारावा, याबद्दल उच्चशिक्षण क्षेत्रात कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे.
लवकरच होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्य़ात दौरे करतांना शिक्षक आणि पदवीधरांच्या सभा बठकांमध्ये गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील सांगतात की, जे शिक्षण रोजगार देऊ शकत नाही, ज्या शिक्षणाने व्यक्तीच्या पोटापाण्याची व्यवस्था होत नाही, दोन वेळ खायची जेथे भ्रांत पडते, असे शिक्षण निरुपयोगी आणि टाकाऊ असून ते बदलण्याची वेळ आली आहे. विद्यमान शिक्षण पध्दतीच्या दोषांवर फटकारे ओढतांना त्यांनी परखडपणे कुणाचाही मुलाहिजा न करता आपले विचार व्यक्त करतात. गंमत म्हणजे, जुन्या आणि नव्या दोन्ही पिढय़ांना ते विचार भावतात. मंत्री होण्यापूर्वी आमदार या नात्याने शिक्षण प्रणालीत बदल करण्याच्या प्रयत्नांची केलेली माहितीही ते सांगतात आणि लोकांच्या आशा पल्लवित होतात.
दुसरीकडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर शिक्षणाचे उद्दिष्ट सांगताना, ‘शिक्षण हे रोजगारासाठी नसते, तर त्याचा उद्देश संस्काराच्या दृष्टीने त्याकडे पहावे, हा असतो. समाजव्यवस्था मजबूत करण्यासाठी शिक्षणाकडे रोजगाराऐवजी संस्कार देणारी व्यवस्था म्हणून पाहिले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाच्या वेळी हे विचार व्यक्त केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, योगी अरिवद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे यांचे नाव न घेता डॉ. चांदेकर यांनी याच विचारवंतांचे विचार व्यक्त केले. डॉ. रणजित पाटील यांच्या मते आता काळ बदलला आहे, जीवनमूल्येही बदलली आहेत, त्यामुळे शिक्षण हे रोजगाराभिमुख असले पाहिजे अन्यथा, ते निरुपयोगी व टाकाऊ सिध्द होईल, अशी स्थिती आहे. त्यामुळेच शैक्षणिक धोरणात बदलाची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली आहे. यवतमाळात शिक्षकांच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे विचार व्यक्त केले. मात्र,इकडे जाऊ की तिकडे, अशी सामान्यजनांची स्थिती झाली असून कुलगुरू आणि गृहमंत्र्यांची स्थिती ‘दोन धृवांवर दोघे आपण..’ अशी मजेदार झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा