मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेचा ठरलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा करत भाजपने शिंदे सेनेची मोठी कोंडी केली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरीही ही जागा सोडण्यास भाजपा तयार नाही. त्यामुळे या ठिकाणाहून कोणाला संधी मिळणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. परंतु, यावरून शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही जागा शिंदे गटालाच मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
दीपक केसरकर म्हणाले, ठाणे हा एकनाथ शिंदेंचा मतदारसंघ आहे. इथे उमेदवार कशाला लागतो? कारण तो उमेदवार थेट पाच लाख मतांनी निवडून येणार आहे. ठाण्यातील जनता आणि एकनाथ शिंदे हे एक अविभाज्य नातं आहे. धर्मवीर आनंद दिघे आणि ठाणे जिल्हा यांच्यात जसं नातं होतं ते एकनाथ शिंदे यांनी जपलं आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून एकनाथ शिंदे जो उमेदवार सांगतील त्या उमेदवाराला सर्वांत जास्त लीड देऊन येथील जनता निवडून आणणार आहे, याची मला खात्री आहे.
हेही वाचा >> ठाणे हवे आहे, पण धनुष्यबाण नको; गणेश नाईकांपुढे नवे सत्तासंकट
ठाकरेंनी जनादेशाचा अपमान केला
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, युवराज जे बोलतात, त्यामुळे एकंदरीत वाट लागली आहे. कोस्टल रोड, खिचडी प्रकरण यामध्ये ठराविकच मित्र मंडळी का दिसतात याचा विचार महाराष्ट्राने केला पाहिजे. राज ठाकरेंचं भाषण ऐका, ते म्हणतात जे खोके म्हणतात त्यांच्याकडे कंटेनर आहेत. आम्ही कोणाकडून एक रुपयाही घेतलेला नाही. मग आम्ही का कोणाचं ऐकून घ्यायचं? आमचं एकच म्हणणं होतं, तुम्ही महायुतीत राहा, तुम्हीच मुख्यमंत्री राहा, तुम्ही मुख्यमंत्री पदावरून उतरूही नका. परंतु, सेना भाजपाची महाराष्ट्रातील युती महाराष्ट्रात आणू. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला मतदान केलं होतं. काँग्रेस विरोधी पक्षात बसावी असा जनादेश मिळाला होता. पण त्याचा अपमान केला. पदासाठी अपमान केला. पण आता पुन्हा मूळ प्रवाह आहे तिकडे गेलं पाहिजे. हा विचार महाराष्ट्राच्या हिताचा आहे. तो आम्ही उघडपणे मांडला”, असं म्हणत दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवरही टीका केली.
हिमालयाला गरज पडली तेव्हा सह्याद्री धावून गेला
महायुतीच्या सभांना त्या त्या भागातील सर्व नगरसेवक, शहर प्रमुख, कार्यकर्ता आणि नेता उपस्थित असतो ही वस्तुस्थिती आहे. ही ताकद निवडणुकीत विरोधकांना दिसणार आहे. विरोधकांना विकासाची लाट महाराष्ट्रात थोपवायची आहे, त्यामुळे ते सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामधील खरी परिस्थिती आहे हे ज्यावेळी महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात येईल, तशीच विकासाची लाट महाराष्ट्रात तयार आहे. कारण महाराष्ट्र भारताचं ग्रोथ इंजिन आहे. ज्या वेळी हिमालयाला गरज असेल तेव्हा सह्याद्री धावून गेलेला आहे. आणि हेच चित्र या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता दाखवून देईल.