नगर अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील सहकार व जनसेवा या दोन्ही प्रमुख पॅनेलमधील उमेदवारीचा गोंधळ अद्यापि मिटलेला नाही. अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले असल्याने कोणाची समजूत काढायची व कोणाला अर्ज मागे घेण्यास सांगायचे असा प्रश्न दोन्ही पॅनेलच्या प्रमुखांपुढे निर्माण झाला आहे. नाराजी वाढू नये यासाठी उमेदवारी जाहीर करण्यास टाळले जात आहे. दरम्यान आज, गुरुवारी मंदार मुळे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. एकूण चौघांनी उमेदवारी माघारीचे अर्ज निवडणूक कार्यालयातून नेले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आजपासून शनिवारी दुपारी २ पर्यंत आहे. आज मंदार मुळे यांनी आपला अर्ज मागे घेतला. निवडणुकीसाठी ८३ जणांनी १४६ अर्ज दाखल केले आहेत. जागा केवळ १८ आहेत. दोन्ही पॅनेलकडे उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. निवडणुकीत सहकार व जनसेवा हेच दोन प्रमुख पॅनेल आहेत. उमेदवारी मिळण्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न सुरू आहेत. दोन्ही पॅनेलमध्ये विद्यमान संचालकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना अपवादात्मक संधी मिळणार आहे.
जिल्हय़ाच्या अर्थकारणात अर्बन बँकेची प्रमुख भूमिका असते. शिवाय बँक आता शतकोत्तर वाटचाल करत आहे, त्यामुळेही उमेदवारीसाठी अनेक इच्छुक आहेत. एकमेकांच्या उमेदवारीचा अंदाज घेऊन दोन्ही पॅनेल प्रमुख उमेदवारीत बदल करण्याच्या तयारीत आहेत. त्यामध्ये जात-धर्म समीकरणाचाही मोठा प्रभाव आहे. अनेक जण शेवटच्या दिवशीच अर्ज मागे घेण्याची शक्यता अधिक आहे.
सहकार पॅनेलचे एक प्रमुख उमेदवार मुकुंद (अप्पा) मुळे यांनी जनसेवा पॅनेलला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे सहकार पॅनेलचे प्रमुख खा. दिलीप गांधी व सुवालाल गुंदेचा यांना मोठा धक्का बसला आहे. खा. गांधी यांच्या नेतृत्वाखाली बँकेत आपण सत्ताधारी म्हणून सहभागी होतो, मात्र दबावामुळे आपल्याला बोलता येत नव्हते. विरोधी संचालकांनी मोठय़ा प्रमाणात गैरप्रकाराबद्दल आवाज उठवूनही त्याला आपण प्रतिसाद देऊ शकत नव्हतो. गांधी यांनी ६६ हजार मतदारांना मतदानापासून वंचित ठेवून सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप मुळे यांनी केला. मुळे जनसेवा पॅनेलच्या शहरातील प्रचार फेरीत सहभागी झाले होते.
दरम्यान, जनसेवा पॅनेल आपला निवडणुकीतील ‘शपथनामा’ शनिवारी (दि. २३) प्रसिद्ध करणार असल्याची माहिती उमेदवार जवाहर मुथा यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा