आघाडीमध्ये वाटय़ाला नसलेल्या मिरजेतील जागेसाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत इच्छुकांच्या दोन गटात राडा झाला. कार्यकर्त्यांची मते अजमावण्यासाठी बोलावण्यात आलेल्या या बैठकीत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. बैठकीनंतर दोन गटांतील धुमश्चक्री चालूच राहिल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला असला तरी याप्रकरणी कोणाचीही तक्रार दाखल झाली नाही.
राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोजशिंदे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस पक्षाचे निरीक्षक शहाजी पाटील, राहुल पवार, नलिनीताई पवार, महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी, युवक अध्यक्ष अभिजित हारगे, महापालिकेचे सदस्य संगीता हारगे, शुभांगी देवमाने, महिला आघाडीच्या अध्यक्षा उषाताई दशवंत आदींसह तालुकास्तरावरील पक्षाच्या विविध सेलवर कार्यरत असणारे कार्यकत्रे उपस्थित होते.
जयंत मागासवर्गीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे व योगेंद्र थोरात यांनी मिरजेतून विधानसभेसाठी उमेदवारी मागितली आहे. दोघांचे समर्थक या बैठकीस मोठय़ा संख्येने उपस्थित होते. बैठकीत समीर सय्यद यांनी डॉ. कांबळे यांच्या नावाचा उमेदवारीसाठी विचार व्हावा अशा भावना व्यक्त केल्या. त्याला थोरात यांचे समर्थक समाधान कांबळे यांनी आक्षेप घेतला. यातून उभय गटात वाद सुरू झाला.
यावेळी थोरातही कार्यकर्त्यांसोबत आक्षेप घेऊ लागल्याने वाद विकोपास गेला. व्यासपीठासमोरच हा वाद सुरू राहिल्याने नेत्यांनी सर्वाना बाहेर जाण्यास सांगितले. सभागृहाबाहेर आल्यानंतर दोन्ही गटाच्या समर्थकांत घमासान माजले. गदारोळातच अज्ञाताने थोरात यांच्या थोबाडीत मारली. मेळावा संपल्यानंतरही बराच काळ वादावादी सुरू राहिल्याने पोलिसांना खबर मिळताच घटनास्थळी पोलीस आले. पोलिसांनी हस्तक्षेप करताच गर्दी पांगली. मात्र याबाबत कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नसल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा