उसाला १५० रुपयांची उचल मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी मंगळवारी झालेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष धैर्यशील पाटील यांना दोन तासांहून अधिक काळ धारेवर धरले. तर, गतवर्षीच्या सभेतील इतिवृत्त कायम करण्याच्या विषयावरून विरोधकांनी अध्यक्षांना लक्ष्य करीत प्रश्नांचा भडिमार चालविला होता. यामुळे सभेत पहिला विषय मंजूर होण्यास पाच तासांहून अधिक काळ लागल्याचे दिसून आले. ही सभा रात्री उशिरापर्यंत सुरू होती. सहकारी साखर कारखान्यांच्या वार्षिक सभांमध्ये भोगावती कारखान्याच्या सभेचा सर्वात अधिक काळ चाललेली सभा अशी नोंद होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या पंधरवडय़ापासून भोगावती साखर कारखान्याच्या वार्षिक सभेवरून वाद झडत आहे. विरोधकांनी कारखान्यातील गरकारभारावर सडकून टीका केल्याने मंगळवारी होणारी सभा गाजणार हे अगोदरच स्पष्ट झाले होते. त्याचा प्रत्यय आज झालेल्या ५८ व्या वार्षकि सर्वसाधारण सभेवेळी आला. सभेच्या प्रारंभी अध्यक्ष धर्यशील पाटील यांनी कारखाना हस्तगत केल्यापासून ठेवीमध्ये वाढ झाल्याचे सांगितले. गत देणी भागवण्यात यश आले आहे. काँग्रेसच्या संचालकांनी बीओटी तत्त्वावर सहविद्युत प्रकल्प उभा करण्यास संमती दर्शविली होती. पण ऐनवेळी कचखाऊ भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला.
अध्यक्ष पाटील यांनी भूमिका मांडल्यानंतर लगेचच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊसाला १५० रुपयांची उचल देण्याची मागणी केली. कारखाना सुस्थितीत असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे असेल तर ते ऊसाला चांगला दर का देऊ शकत नाहीत असा प्रश्न संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. जािलदर पाटील, जनार्दन पाटील व सहका-यांनी उपस्थित केला. कारखान्याच्या कार्यकारी संचालकांची नार्को टेस्ट केली तर कारखान्यातील गरकारभारावर प्रकाशझोत पडेल अशी टीकाही त्यांनी केली. सुमारे दोन तासाहून अधिक काळ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रश्न उपस्थित करुन अध्यक्ष पाटील यांना भंडावून सोडले होते.
कारखान्याच्या कारभारावर हल्ला चढविण्याचे काम संचालक अशोक पोवार यांनीच केले. त्यांनी भोजनाचे बिल पाच हजार आणि दारुचे बिल अकरा हजार रुपये कसे झाले, असा प्रश्न उपस्थित करुन अध्यक्षांची बोलती बंद केली. तर संघटनेचे जे. जे. पाटील यांनी त्रिवेणी मिलचे गिअर आणण्यासाठी अधिकारी नवीदिल्लीला गेले असताना त्यांनी जम्मू काश्मीरची सहल करुन त्याचा खर्च कारखान्यावर टाकल्याचे उघडकीस आणले. इतिवृत्त मंजूर करण्याच्या विषयावरुन सदाशिव चरापले, उदयसिंह पाटील-कौलवकर, संजय तारळेकर यांनी सत्ताधा-यांवर टीकास्त्र सोडले. सभेच्या विषय पत्रिकेवर दहावा  विषय हा भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचा होता. पण अनेक सभासदांनी या संस्थेच्या कारभारातील दोषांकडे बोट दाखवित हा विषय सर्वप्रथम चच्रेला घेण्याची मागणी केल्याने त्यावरुन सभेत जोरदार गदारोळ झाला.

Story img Loader