कॉंग्रेसने महेश मेंढे हा बाहेरचा उमेदवार दिल्याने आणि पालकमंत्री संजय देवतळे शेवटच्या क्षणी भाजपात गेल्याने या जिल्ह्य़ातील कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारही संभ्रमात पडले आहेत. कॉंग्रेसमधील हा गोंधळ व संभ्रमाचे वातावरण राष्ट्रवादीसाठी अधिक फायदेशीर ठरत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
एकूण सहा विधानसभा मतदारसंघ असलेल्या या जिल्ह्य़ात प्रत्येकी तीन मतदारसंघांवर भाजप व कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. यात चंद्रपूर, बल्लारपूर व ब्रम्हपुरीवर भाजपा, तर राजुरा, वरोरा व चिमूर मतदारसंघावर कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, कांॅग्रेसने वध्रेचे महेश मेंढे यांना चंद्रपुरातून उमेदवारी दिल्याने व शेवटच्या क्षणी पालकमंत्री संजय देवतळे भाजपात गेल्याने काँग्रेसमध्ये कमालीचा गोंधळ उडाला आहे. कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजी व प्रदेश कॉंग्रेस समितीच्या चुकीच्या निर्णयामुळे कधी काळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या जिल्ह्य़ावर भाजपाचे वर्चस्व आहे.
१९८० च्या दशकापासून तर आजवर कॉंग्रेस पक्षात वामनराव गड्डमवार, माजी केंद्रीय अर्थमंत्री शांताराम पोटदुखे व नरेश पुगलिया हे दोन गट सक्रीय होते. गड्डमवार यांच्या अकाली निधनानंतर जिल्हा कॉंग्रेसवर नरेश पुगलिया गटाचे वर्चस्व होते.
मात्र, सततच्या पराभवामुळे पुगलिया सत्तेच्या राजकारणात मागे पडले व संजय देवतळे-विजय वडेट्टीवार-सुभाष धोटे गटाचा उदय झाला. देवतळेंनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा विश्वास संपादन करून कॅबिनेट मंत्री व पालकमंत्रीपदी वर्णी लागल्याने देवतळे-धोटे एकीकडे आणि वडेट्टीवार दुसरीकडे, असे विभाजन झाले. त्याचा परिणाम कॉंग्रेस कार्यकर्ते पुगलिया-देवतळे-वडेट्टीवार-धोटे, अशा चार गटात विभागले गेले. कधीकाळी एकसंघ असलेली कॉंग्रेस चार नेत्यांमध्ये विभागल्याने कॉंग्रेसची शक्ती कमी झाली.
अशातच प्रदेश कॉंग्रेसने जिल्हा कॉंग्रेसचे ग्रामीण व शहर, अशा दोन भागात विभाजन करून शहर कॉंग्रेस देवतळे समर्थक नंदू नागरकर व ग्रामीण कॉंग्रेस वडेट्टीवार समर्थक प्रकाश देवतळे यांच्याकडे नेतृत्व सोपविल्याने कॉंग्रेसचे पुन्हा विभाजन झाले. नेत्यांच्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईत कॉंग्रेसची वाताहत झाली. विभाजित कॉंग्रेसला एकसंघ करण्याची गरज असतांना वध्र्याचे महेश मेंढे यांना चंद्रपुरातून उमेदवारी दिली, तर देवतळे भाजपवासी झाल्याने कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदारही संभ्रमात पडले आहेत. अशा संभ्रमाच्या स्थितीत कुणाकडे जायचे, असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडला आहे. कॉंग्रेसमधील या संभ्रमावस्थेचा फायदा राष्ट्रवादीला होतांना दिसत आहे. राष्ट्रवादीने ऐनवेळी सर्वमान्य उमेदवार अशोक नागापुरे यांना तिकीट दिल्यामुळे कॉंग्रेस पक्षात मेंढे विरोधक कॉंग्रेसी नागापुरे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहात असल्याचे चित्र दिसत आहे.
प्रत्यक्षात माजी खासदार नरेश पुगलिया यांनी चंद्रपुरातून अशोक नागापुरे यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती, परंतु प्रदेश कॉंग्रेसने ऐनवेळी महेश मेंढे यांना उमेदवारी दिली. त्याचा परिणाम मेंढेंना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातांना साधी रॅलीही काढता आली नाही. शाळा-महाविद्यालयातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार, नरेश पुगलिया, विजय वडेट्टीवार यांचे छायाचित्र असलेल्या वहय़ा-पुस्तकांचे वाटप करणारे मेंढे यांना जिल्ह्य़ातील निष्ठावंत कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते कोण, याची साधी माहिती सुध्दा नाही. स्वत:च्या फायद्यासाठी कधी संघ, तर कधी भाजपच्या संपर्कात असलेले मेंढे अगदी वेळेवर कॉंग्रेसमध्ये आले. लोकांचे पाठबळ असलेला एकही नेता मेंढे यांच्यासोबत नाही. मेंढेंना उमेदवारी दिल्याने बहुतांश कॉंग्रेसी नागापुरे यांच्या पाठिशी असल्याचे चित्र आहे. तिकडे देवतळे भाजपवासी झाल्याने त्यांच्याबद्दल कॉंग्रेसमध्ये प्रचंड रोष आहे. यातूनच माजी खासदार नरेश पुगलियांसह सर्व वरिष्ठ नेते कॉंग्रेसच्या वरोऱ्याच्या उमेदवार डॉ.आसावरी देवतळे यांच्याा पाठिशी उभे झाले आहेत. राजुराचे उमेदवार सुभाष धोटे यांचा पालकमंत्री संजय देवतळे यांना छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिंपरी येथील निष्ठावान कॉंग्रेसी धोटे यांच्यावर नाराज आहेत. या नाराजीचा फायदा राजुरात राष्ट्रवादीचे सुदर्शन निमकर यांना मिळत आहे. एकूणच कांॅग्रेसमधील नाराजी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडत असल्याचे चित्र चंद्रपूर व राजुरा या दोन मतदारसंघात आहे.

Story img Loader