जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष, आमदार विनय कोरे यांनी कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याने उमेदवार खुशीची गाजरे गात असताना शुक्रवारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी मात्र आघाडीतील एकाही पक्षाने नियोजनात न घेतल्याबद्दल संताप व्यक्त करून पक्षाच्या कार्यकर्त्यांना बगल देण्याचा प्रयत्न अंगलट येईल, असा इशारा दिला आहे. निवडणूक काळात जिल्हाध्यक्ष म्हणून करावे लागणाऱ्या ‘जोडणी’ तून वगळल्याचा राग त्यांनी जाहीरपणे व्यक्त केल्याने आघाडीसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
लोकसभा निवडणुकीचे अर्ज भरले जात असताना जनसुराज्य शक्ती पक्ष मनसेशी आघाडी करणार असे चित्र निर्माण झाले होते. तथापि, जनसुराज्य शक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार कोरे यांनी आपल्या भूमिकेत बदल केला. गेल्या आठवडय़ात प्रथम त्यांनी हातकणंगले मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. पण कोल्हापुराबद्दल भूमिका मात्र अंधातरी ठेवल्याने धनंजय महाडिक समर्थकात चुळबूळ सुरू झाली होती. कोरे गटाचा शहरासह जिल्ह्य़ाच्या दक्षिण भागात काही प्रमाणात प्रभाव असल्याने त्यांचा पाठिंबा निवडणूक काळात उपयुक्त ठरणारा आहे. हे ओळखून आमदार महादेवराव महाडिक यांनी आमदार कोरे यांची भेट घेऊन पाठिंबा देण्याची विनंती केली होती. अखेर याबाबत निर्माण झालेली कोंडी फोडत कोरे यांनी दोन दिवसांपूर्वी महाडिक यांनाही पाठिंबा घोषित केला. कोरेंची साथ मिळाल्याने महाडिक समर्थक सुखावले असताना दुसरीकडे जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी मात्र शुक्रवारी दोन्ही काँग्रेस निवडून येण्याइतका मताचा कोटा पूर्ण झाल्याच्या भ्रमात आहेत अशी शेरेबाजी करीत पक्षाच्या कार्यकर्त्यांची नोंद न घेतल्यास ऐनवेळी वेगळा विचार करावा लागेल असे म्हणत बंडाचा झेंडा उगारला आहे.
पक्षाच्या मताबरोबर स्वतची ५० हजार मते असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. कर्मचाऱ्यांच्या २१ संघटनांनी आपणास पाठिंब्याचे पत्र दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. व्यासपीठावर फौजा दिसत असल्याने उमेदवार भांबावले आहेत, पण मागील लोकसभेचा अनुभव लक्षात घेता नेते कितीही असले तरी तळागाळातील जनता, कार्यकर्ते त्यांचे विचार स्वीकारतील अशी परिस्थिती नसल्याचा घरचा आहेर जिल्हाध्यक्षांनी दिला आहे. पक्ष विषय बाजूला ठेवून दोन्ही मतदारसंघात उलथापालत करण्याची क्षमता आमच्यात आहे. दोन दिवसात शिस्तबध्द नियोजन न झाल्यास पक्षाचा पाठिंबा बाजूला ठेवून जय महाराष्ट्र म्हणून शिट्टी वाजविण्याची वेळ येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. या संदर्भात झालेल्या बैठकीस तालुकाध्यक्ष दत्ता चौगले, बी.एस.पाटील, बाजीराव पाटील, अनिल कवाळे, बाळासाहेब गुरव, तानाजी मोरे, महेश परीट, सतीश जगदाळे यांच्यासह तालुक्यांचे अध्यक्ष, शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते, असे संजय पाटील यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा