पालिकेचे अधिकारी, कर्मचारी नगरसेवकांना जुमानत नाहीत. नगरसेवकांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असतील तर सामान्य जनतेने काय करावे, अशा शब्दांत आपली हतबलता व्यक्त करत नगरसेवकांनी मुख्याधिका-यांना धारेवर धरले. जनतेच्या हिताची कामे होणार नसतील तर पुढील सभेच्या वेळी ऑइलचे डबे सभागृहात आणण्याचा इशारा देण्याची वेळ सत्ताधारी नगरसेवकावर आली. पालिकेच्या एकूणच कारभारावर कोणाचाच वचक राहिला नसून सगळे काही रामभरोसे चालू असल्याचे शुक्रवारच्या सभेत अधोरेखित झाले.
नगराध्यक्ष दिलीप पुंड यांच्या अध्यक्षतेखाली आज पालिकेची विशेष सभा झाली. मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, उपनगराध्यक्ष जावेद जहागिरदार यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. पालिकेचा कारभार ठेकेदारधार्जिणा झाल्याचा आरोप करत लोकांनी आम्हाला कामे करण्यासाठी निवडून दिले आहे, लोकांची कामे व्हायलाच हवीत अशी मागणी सत्ताधाऱ्यांसह विरोधी नगरसेवकही करत होते. ठेकेदाराच्या बिलाची फाइल गहाळ झाली म्हणून मुख्याधिकाऱ्यांनी तीन कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले, मात्र नगरसेवकांच्या तळमळीचे त्यांना काहीच देणेघेणे नसल्याची टीका सेनेच्या कैलास वाकचौरे यांनी केली. नगरसेवकांना कोणी जुमानत नसेल तर पुढच्या सभेत ऑइलचे डबे आणण्याचा इशारा सत्ताधारी नगरसेवकाने दिला.
किरकोळ कामांसाठी पालिकेकडे पैसे नसल्याचा बहाणा करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी रस्तेखोदाईपोटी रिलायन्सकडून मिळालेले ८९ लाख रुपये ठेकेदारांना देण्यासाठी वापरले. साधे पथदिव्यांतले दिवे बसविण्यासाठी मुख्याधिकारी तरतूद करू शकत नसल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधण्यात आले. बेकायदा बांधकामांबाबत केवळ नोटिसा देण्याचे सोपस्कर केले जातात, मात्र कारवाई होत नसून बेकायदा बांधकामांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा आरोप राधावल्लभ कासट यांनी केला. प्रशासनाची मुजोरी आणि नाकर्तेपणापुढे विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी हतबल झाल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले.
‘संगमनेर पालिकेचा कारभार रामभरोसे’
पालिकेचे अधिकारी, कर्मचारी नगरसेवकांना जुमानत नाहीत. नगरसेवकांना उडवाउडवीची उत्तरे मिळत असतील तर सामान्य जनतेने काय करावे, अशा शब्दांत आपली हतबलता व्यक्त करत नगरसेवकांनी मुख्याधिका-यांना धारेवर धरले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-05-2014 at 03:34 IST
TOPICSगोंधळ
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Confusion in sangamner corporation management